राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांचा मोठा गट घेऊन अजित पवार राज्याच्या सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत असले तरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांकडून अधून मधून केला जात आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार अपात्र ठरतील, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटासह काँग्रेसकडून केला जात आहे. असं झाल्यास अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चादेखील सुरू आहे.

शिवसेना आमदारांच्‍या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी गेल्या तीन महिन्यात पुरेशी कार्यवाही न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच एका आठवड्याच्‍या आत सुनावणी सुरू करण्‍याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. म्हणूनच भाजपाने त्यांचा प्लॅन बी तयार केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आणि मुख्यमंत्री बदलांच्या चर्चांवर प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी बच्चू कडू यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे आमदार अपात्र होऊन अजित पवार, देवेंद्र फडणवीस किंवा राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सध्या सुरू आहे, या चर्चेत किती तथ्य आहे? यावर बच्चू कडू म्हणाले, असं होऊ शकत नाही. तसं झाल्यास भाजपाला परिणाम भोगावे लागतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार बच्चू कडू म्‍हणाले, ” आत्ताच ज्‍या काही गडबडी केल्या आहेत, त्यामुळे राज्यात नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. हे वातावरण सकारात्मक करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कसरत करावी लागत आहे. त्यातच आता जर एकनाथ शिंदे यांना सत्तेतून बाहेर काढलं, मुख्यमंत्री पदावरून हटवलं तर भाजपाचं नुकसान होईल. कारण एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्‍यांचे ५ ते १० टक्के मतदार या सगळ्यामुळे नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन कामी येणार नाहीत. मग लोक त्यांचा प्लॅन सुरू करतील. मग त्या प्लॅनमध्ये कोणता पक्ष ठेवायचा आणि कोणता पक्ष ठेवायचा नाही ते लोक ठरवतील.