दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीत एका दलिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी ७० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असताना याच प्रकरणात न्याय वैद्यक विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार त्या दलिताचा मृत्यू मारहाणीतून नव्हे तर शारीरिक आजारामुळे झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा आरोप मागे घेण्याची विनंती पोलिसांकडून विशेष न्यायालयाला केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
उळे येथे कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना घेण्यात आलेले छायाचित्र महाविद्यालयातील सूचना फलकावर लावले असता छायाचित्रात एका दलित विद्यार्थिनीची छबी खराब करण्यात आली होती. त्यावरून ११ मार्च रोजी गावात दोन गटात दंगल होऊन त्यात दलित वस्तीवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात मच्छिंद्र गोरख गायकवाड (४५) याचा मृत्यू झाला होता. तर इतर नऊदहा जण जखमी झाले होते. या प्रकरणी बुद्धभूषण गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीवरून सुमारे ७० जणांच्या जमावाविरुद्ध सोलापूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेमुळे दलित-सवर्ण समाजातील दरी वाढली होती. एका बाजूला हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी विविध दलित समाज संघटनांनी आंदोलन छेडले असता दुसऱ्या बाजूला सवर्णाच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचा आक्षेप घेत त्या विरोधात सवर्ण समाजाच्या बाजूनेही प्रतिआंदोलन करण्यात आले होते. यातच राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थूल यांनी उळे येथे दंगलग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली होती. त्या वेळी मृताच्या वारसदारांना अडीच लाखांची मदत अदा करण्यात आली होती.
या पाश्र्वभूमीवर उळे येथील दंगलीचे प्रकरण संवेदनशील विषय ठरला असताना पोलीस तपास यंत्रणेने मृत मच्छिंद्र गायकवाड याच्या न्याय वैद्यक तपासणीचा अहवाल मागवून घेतला असता त्यात मृत्यूचे कारण मारहाणीतून नव्हे तर शारीरिक आजारातून झाल्याचे पुढे आले आहे. शरीरात रक्ताच्या गुठळ्या आणि पू झाल्यामुळे मच्छिंद्र गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल न्याय वैद्यक यंत्रणेकडून प्राप्त झाला आहे. त्याचा आधार घेत पोलीस तपास यंत्रणेने आरोपींविरुद्ध लावलेला खुनाचा आरोप मागे घेण्याची विनंती विशेष न्यायालयात अर्जाद्वारे करण्यात आली आहे. त्यावर न्यायालय निर्णय घेणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jun 2015 रोजी प्रकाशित
उळे दंगलीत दलिताचा मृत्यू मारहाणीतून नव्हे तर आजारामुळेच
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीत एका दलिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी ७० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असताना याच प्रकरणात न्याय वैद्यक विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार त्या दलिताचा मृत्यू मारहाणीतून नव्हे तर शारीरिक आजारामुळे झाल्याचे उघड झाले आहे.
First published on: 21-06-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Backward person death due to ill not to beating in ule insurrection