सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोघे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्याप्रमाणे दोघे ठाकरे बंधू खरोखर एकत्र येतील की नाही, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नाही. राजकारणात योग्य वेळ यावी लागते, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली.

शुक्रवारी, सोलापुरात खासगी भेटीसाठी नांदगावकर आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याच्या वाढलेल्या चर्चेसंदर्भात सावध उत्तर दिले. शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे, तेच होईल, असे सूचक विधान केले होते. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याबाबतची उत्सुकता राज्यात वाढली आहे. त्याबाबत लक्ष वेधले असता बाळा नांदगावकर यांनी सावधपणे भाष्य केले.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत पुढे काय होईल, या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. यासंदर्भात आपण राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असली तरी त्यातून उत्तर सापडत नाही. राज ठाकरे यांच्या मनात काय चालले आहे, हेही स्पष्ट होत नाही. मात्र राज ठाकरे यांच्या मनात जे काही आहे, तेच माझ्याही मनात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. खरे तर बाळासाहेब ठाकरे हयात असताना उद्धव आणि राज यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता, अशी आठवण नांदगावकर यांनी करून दिली.

ते म्हणाले, की राजकारणात वेळ नेहमीच येत असते. मात्र, कुठलीच वेळ कधी वाईट नसते. राजकारणात चांगले वाईट घडत असते. त्यासाठी वेळ महत्त्वाची असते, असे सूचित करताना नांदगावकर यांनी, महाभारतातील ‘समय बडा बलवान होता है’ या वाक्याचा संदर्भ दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेला धुमारे फुटले असताना सोलापुरात बाळा नांदगावकर यांचे स्वागत करण्यासाठी मनसेप्रमाणेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तेवढ्याच उत्साहाने पुढे आले होते. मनसेचे नेते दिलीप धोत्रे, महेश इंगळे, अमर कुलकर्णी यांच्याप्रमाणेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण हे नांदगावकर यांच्या स्वागतासाठी सरसावले होते.