प्रशांत देशमुख, वर्धा

शासकीय महाविद्यालयांचाही समावेश; ‘आयुष’ मंत्रालयाची कारवाई

विविध त्रुटींवर बोट ठेवत देशभरातील ६४ आयुर्वेद महाविद्यालयांतील यावर्षीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला  असून यात महाराष्ट्रातील नऊ महाविद्यालयांचा समावेश आहे.

यावर्षी ३१ ऑक्टोबपर्यंत आयुर्वेद महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया चालणार आहे. मात्र, याच दरम्यान हा निर्णय केंद्राने घेतल्याने बंदी घातलेल्या महाविद्यालयांवर संक्रांत आली आहे. यात देशभरातील ३६० आयुर्वेद महाविद्यालये आहेत. त्यापैकी ६४ महाविद्यालयांच्या  प्रवेश प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात शासकीय अनुदानित महाविद्यालयांचाही समावेश आहे.

भारतीय केंद्रीय चिकित्सा (सीसीआयएम) परिषदेच्या शिफोरशीने ही कारवाई ‘आयुष’ मंत्रालयाने केली आहे. या महाविद्यालयाची तपासणी करीत चिकित्सा परिषदेने त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या. त्या दुरुस्त करण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र, महाविद्यालय व्यवस्थापनाने सुधारणा न केल्याने आयुष मंत्रालयाने कारवाईचा बडगा उगारला.

पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवणाऱ्या या महाविद्यालयांत विविध त्रुटी आढळून आल्या होत्या. विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत ४० टक्केखाटांची कमतरता, अपेक्षित पात्रताधारक प्राध्यापकांचा अभाव, पुरेशी कर्मचारी संख्या नसणे, दिलेल्या मापदंडानुसार रुग्णालयात रुग्णांसाठी सोयी नसणे, चिकित्सा परिषदेच्या नियमावलींचे पालन करण्यात टाळाटाळ, अभ्यासिका, पटांगण व अनुषंगिक सोयींचा अभाव, आदी कारणे प्रवेश बंदीमागे आहेत. आयुर्वेद शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अशी पावले आता आवश्यक ठरली असून शासनाच्या या निर्णयाचे स्वागतच करायला हवे, अशी प्रतिक्रिया आयुर्वेद वर्तुळातून  व्यक्त करण्यात आली.

—————

महाराष्ट्रातील नऊ महाविद्यालये

डॉ. आर.एस. लाहोटी आयुर्वेद मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटल सुलतानपूर ,( जि. बुलढाणा, खासगी) शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेद कॉलेज, बसमत (जि. हिंगोली, खासगी), श्री गजानन महाराज संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालय पुसद (जि. यवतमाळ, खासगी), आयुर्वेद कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिटय़ूट बुलढाणा (खासगी), स्वामी विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय, श्रीगोंदा (जि. अहमदनगर, खासगी), रामराव पाटील आयुर्वेद महाविद्यालय पूर्णा (जि. परभणी, खासगी), दादासाहेब स्वरूपसिंग नाईक आयुर्वेद महाविद्यालय, नांदगाव (जि. धुळे, खासगी), रूरल इन्स्टिटय़ूट ऑफ  आयुर्वेद अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर मायनी (जि. सातारा, खासगी), ज्युपिटर आयुर्वेद मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड तारिणी आयुर्वेद हॉस्पिटल, नागपूर, (खासगी).