अलिबाग : पीओपी गणेशमुर्तींवरील विक्रीवरील निर्बंध उठवण्यात आले असले तरी अलिबाग नगरपरिषदेकडून शहरात ठिकठिकाणी पीओपी गणेमुर्ती नकोच अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुर्तीकार आणि गणेश भक्तामध्ये संताप आहे.गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशमुर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग कार्यशाळांमध्ये सुरू आहे. गणेशमूर्तींचे गाव म्हणून नावारूपास आलेल्या पेण मधून लाखो गणेशमुर्ती देशाविदेशात पाठवण्यात आल्या आहेत.

पीओपी गणेशमूर्तींच्या विक्रीवरील निर्बंधांचा ढग दूर झाले आहेत. या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. असे असले तरी अलिबाग नगरपरिषदेमार्फत शहरात ठिकठिकाणी पीओपी गणेशमूर्ती नकोच अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे उच्च न्यायालयाकडून पीओपीच्या गणेशमूर्तींच्या निर्मिती, खरेदी आणि विक्रीवर बंदी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशभक्त आणि मुर्तीकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. घरोघरी लाडक्या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. मोठ्या भक्तीभावाने गणेशाची आराधना केली जाते. मात्र नगरपालिकेच्या बॅनरबाजीमुळे पीओपीच्या गणेशमूर्तींबाबत संभ्रम निर्माण होत आहे. न्यायालयाने पीओपी मूर्तीच्या विक्री आणि वितरणावरचे निर्बंध हटवले आहेत. केवळ पीओपीच्या सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जन करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. अशा वेळी अलिबागच्या नगरपरिषदेकडून पीओपी मूर्ती नकोच असा आग्रह करणे योग्य नसल्याचे मत मूर्तीकार आणि विक्रेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.

दरम्यान अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांची या संदर्भातील प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही…उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूर्ती विक्रीवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे नगर परिषदेने अशी बंदी घालणं योग्य नाही. ॲड अंकित बंगेरा, शहराध्यक्ष भाजपा</p>