सांगली : जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेधार्थ गुरूवार दि. ७ सप्टेंबर रोजी  जिल्हा बंदचा निर्णय मंगळवारी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच मराठा आरक्षण मागणीसाठी व्यापक मोर्चाही काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठा समाज भवनमध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा समाजाची बैठक आज पार पडली. या बैठकीस आमदार विक्रमसिंह सावंत, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, डॉ.संजय पाटील, विलास देसाई, माजी उपमहापौर उमेश पाटील, शंभूराज काटकर, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष शहाजीबापू पाटील, सतिश साखळकर, वैभव शिंदे आदीसह विविध गावातील मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा >>> “एकनाथ खडसे यांची मस्ती जिरली नाही का? आमची…”, ‘त्या’ टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर

प्रारंभी बैठकीमध्ये बंदचे आयोजन करायचे की मोर्चाचे नियोजन करायचे यावर मतमतांतरे प्रदर्शित झाली. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे असेच मत सर्वानी व्यक्त करीत आता निर्णायक लढ्यासाठी सज्ज राहण्याची वेळ आली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

अखेरीस गुरूवार दि. ७ सप्टेंबर रोजी जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यात बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या बंदमधून ज्या गावात अथवा शहरात या घटनेवरून गेल्या चार दिवसात बंद पाळण्यात आला आहे ती गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मंगळवारी जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी कडेगाव तालुका बंद पाळण्यात आला. कडेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयात तहसिलदार अनिल शेलार यांना निवेदन देण्यात आले.