अहिल्यानगर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, शनिवारी दिवंगत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांची बुऱ्हाणनगर येथे भेट घेत त्यांचे सांत्वन केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्व. कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले आणि त्यांच्या कार्याच्या आठवणी जागवत श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी आमदार संग्राम जगताप, भाजपचे महामंत्री विजय चौधरी, माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होते. कर्डिले कुटुंबीयांपैकी पत्नी अलका कर्डिले, चिरंजीव अक्षय कर्डिले उपस्थित होते. दरम्यान, काल शुक्रवारी रात्री उशिरा अंत्यविधी झाल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कर्डिले कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

कर्डिले कुटुंबीयांचे सांत्वन करताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, कर्डिले कुटुंबीयांमागे संपूर्ण भाजप ठामपणे उभा आहे. स्व. कर्डिले यांचे अपूर्ण राहिलेली स्वप्ने आम्ही नक्की पूर्ण करू. ते फक्त एक नेते नव्हते, तर एक संघर्षशील योद्धा होते. त्यांनी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून काम केले. कुठल्याही संकटकाळात ते पहिल्यांदा धावून जात असत. अशा धाडसी व्यक्तींची आजच्या काळात खूप गरज आहे.

बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, शिवाजी कर्डिले हे माझे मोठे बंधू होते. गेली २१ वर्षे ते माझ्या सुख-दुःखात कायम सहभागी राहिले. उपस्थित आमदार संग्राम जगताप व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही स्व. कर्डिले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कुटुंबीयांना भावनिक आधार दिला.

भाजपचे महामंत्री विजय चौधरी श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, शिवाजी कर्डिले यांनी नेहमीच कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे अनेकांना राजकारणात आणि समाजकारणात वाट मिळाली. त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील. कर्डिले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी जिल्हाभरातून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, नागरिकांची दिवसभर रीघ सुरू होती.