बीड – वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरीस लागलेल्या तरुणाला संस्थाचालकाने अपमानास्पद वागणूक दिल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. परळी तालुक्यातील नंदागौळ येथे ही घटना घडली. या प्रकरणात दोन संस्थाचालकांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीनाथ गोविंद गित्ते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

श्रीनाथ गित्ते याचे वडील गोविंद गित्ते हे केज येथील साने गुरुजी आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०१० मध्ये त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर २०१६ पासून गित्ते कुटुंब श्रीनाथ याला अनुकंपा तत्वावर नोकरीस घ्यावे अशी विनंती साने गुरुजी आश्रम शाळेच्या उद्धव कराड यांच्याकडे करत होते. परंतु त्याने गित्ते कुटुंबाची विनंती मान्य न करता त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.यानंतर गित्ते कुटुंबाने प्रशासन दरबारी पाठपुरावा करत परळीत असलेल्या वसंत नगर तांडा येथील आश्रम शाळेत नोकरी मिळण्याबाबतचा आदेश मिळाला.

यानंतर वसंत नगर येथील आश्रम शाळेवर रुजू झाल्यानंतर संस्थाचालक संजय राठोड यांनी देखील गित्ते कुटुंबाला त्रास दिला. तसेच श्रीनाथ याला अपमानास्पद वागणूक देत अतिरिक्त काम करण्यास भाग पाडले. या सर्व प्रकाराचा ताण सहन न झाल्याने श्रीनाथ याने दिनांक २२ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आई सुनीता गोविंद गित्ते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय राठोड व उद्धव कराड या दोन संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझ्या मुलाला त्याच्या शिक्षणा प्रमाणे नोकरी दिली नाही.आमच्या परिस्थितीमुळे आम्ही आहे त्या पदावर नोकरीसाठी होकार दिला.माझ्या मुलाला शाळेत चार माणसाचे काम करावे लागत होते.उद्धव कराड याच्या केज येथील साने गुरुजी आश्रम शाळेची चौकशी करावी. – सुनीता गोविंद गित्ते,मयत श्रीनाथ गित्ते याची आई

आमच्या संस्थेमध्ये जागा शिल्लक नसताना देखील वरिष्ठांनी ऑर्डर दिलेली असल्याने आम्ही त्याला रुजू करून घेतले होते.जी घटना घडली त्याची संपूर्ण चौकशी व्हावी अशी आमची देखील मागणी आहे. – अरुण पवार, मुख्याध्यापक सखाराम नाईक माध्यमिक शाळा

संस्थाचालकाच्या त्रासातून जिल्ह्यातील दुसरी आत्महत्या

बीड जिल्ह्यात आश्रमशाळा चालकांच्या त्रासातून झालेली ही दुसरी आत्महत्या ठरली आहे.याआधी केज तालुक्यातच मुंडे नामक संस्थाचालकाने दिलेल्या त्रासामुळे शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर आता उद्धव कराड व संजय राठोड या दोन संस्थाचालकांनी त्रास दिल्याने २५ वर्षीय तरुणाला गळफास घेतला आहे.