राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पुन्हा एकदा खुलासा केला आहे. “मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली,” असं म्हणत कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला क्षमा करण्याचं आवाहन केलं आहे. या निवेदनात त्यांनी त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही, असंही नमूद केलं.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “२९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.”

“भाषणात माझ्याकडून निर्हेतूकपणे काही चूक झाली असेल, तर…”

“गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतूकपणे काही चूक झाली असेल, तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही,” असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं.

हेही वाचा : “कोश्यारींसारख्यांना महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत”, आदित्य ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल

“जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल”

“महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो,” असंही कोश्यारींनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते होते?

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”