…मग आम्हीही भगतसिंह कोश्यारी यांना उत्तर देऊ; नाना पटोलेंचं राज्यपालांवर टीकास्त्र

“पंडित नेहरू यांच्यावरील टीका राज्यपालांना शोभत नाही. त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांना स्वातंत्र्य आहे की, काय बोलावं”, असा टोला पटोले यांनी लगावला.

Maharashtra governor Bhagat Singh Koshyari, former Prime Minister the late Pandit Jawaharlal Nehru, nana patole
"पंडित नेहरू यांच्यावरील टीका राज्यपालांना शोभत नाही. त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांना स्वातंत्र्य आहे की, काय बोलावं", असा टोला पटोले यांनी लगावला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. नेहरूंच्या धोरणामुळे देश कुमकुवत झाल्याची टीका राज्यपालांनी केली होती. राज्यपालांनी नेहरूंवर केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “पंडित नेहरू यांच्यावरील टीका राज्यपालांना शोभत नाही. त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांनी स्वातंत्र्य आहे का, यावर बोलावं”, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट होते. त्यापैकी पटोले जहाल गटातील असल्याची टीका झाल्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं. यावर नाना पटोले यांनी भाष्य केलं. “माझी तक्रार तर देशाच्या प्रमुखांकडे देखील आजकाल होते. त्यामुळे माझी पक्षाकडे तक्रार होत नाही. हा नाना पटोले देशासाठी लढणारा आहे. त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं. देशातील जनतेला न्याय मिळावा, हीच भूमिका माझ्या मनात आहे. अन्याय करणाऱ्या व्यवस्थेविरोधात आवाज उठवणं म्हणजे त्याला जहाल व्यक्तिमत्त्व म्हटलं जातं. जर त्यांचं मत असेल की, जहाल आहे; तर जहाल आहे”,

“पंडित नेहरू यांच्यावरील टीका राज्यपाल यांना शोभत नाही. त्यांनी भाजपचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांना स्वातंत्र्य आहे का, यावर बोलावं. राज्यपालांच्या खुर्चीवर बसून अशा प्रकारची टीका करण्याचे अधिकार राज्यपालांना नाही. ते भगतसिंग कोश्यारी म्हणून बोलत असतील. तो त्यांचा अधिकार आहे. मग त्यांना ती खुर्ची सोडावी लागेल. मग आम्ही त्यांना उत्तर काय द्यायचे ते निश्चित देऊ”, असा इशारा पटोले यांनी दिला.

संबंधित वृत्त- नेहरुंच्या शांतीदूत धोरणामुळेच देशाचं नुकसान; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची टीका

स्पर्धा परीक्षेच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या जागा ३१ जुलै पर्यंत भरल्या जाणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली होती. ती मदत उलटून गेली आहे. त्यावर ते म्हणाले की, “या प्रश्नावर आम्ही अजित पवारांची भेट घेणार आहोत. तातडीने सर्व जागा भराव्यात अशी मागणी राहणार आहे. तसेच या डेडलाईनची आठवण देखील करून दिली जाणार आहे”, असंही पटोले म्हणाले.

भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते?

“अटलबिहारी यांचा कार्यकाळ सोडून दिला, तर त्याआधी वाटलं की देशाच्या सुरक्षेकडे लोकांचं लक्ष खूप कमी आहे. मी पंडित जवाहरलाल नेहरुंचा खूप आदर करतो; पण त्यांची कमजोरी होती. त्यांना वाटायचं की, शांतीदूत बनावं वाटायचं, कबूतरं उडवावी. यामुळे देश कमकुवत झाला आणि खूप काळापर्यंत हे सुरुचं होतं. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुबॉम्बची चाचणी केली. तो अणुबॉम्ब २० वर्षांपासून तसाच ठेवला होता. सरकार घाबरायचं पण आमच्या वाजपेयीजींनी चाचणी घडवून आणली. जगाने आपल्यावर निर्बंध आणले, पण अटलजींना आपल्या देशातल्या नागरिकांवर विश्वास होता. मी आपल्या सैनिकांदेखील सांगतो जसा आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे; तसाच तुम्हालाही आमच्यावर विश्वास असायला हवा की देश तुमच्या सोबत आहे,” असं राज्यपाल म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bhagat singh koshyari criticised pandit nehru policy nana patole slams bhagat singh koshyari bmh 90 svk