अलिबाग – महायुतीमधील घटक पक्षात असलेल्या अंतर विरोधामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. तर अनेक प्रयत्न करूनही गोगावले यांची पालकमंत्री पदावर वर्णी लागू शकलेली नाही. अखेर पालकमंत्री कर असे म्हणत गोगावले यांनी गणरायाला साकडे घातले आहे.
मंत्री पद असो अथवा पालकमंत्री पद भरत गोगावले यांनी आपल्या महत्वाकांक्षा कधी लपवलेल्या नाहीत याची प्रचिती रायगडकरांना पुन्हा एकदा आली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनतेचे भले होऊ दे आणि मला रायगडचे पालकमंत्रीपद मिळू दे असे साकडं गणरायाकडे त्यांनी घातले आहे. माध्यमांशी बोलतांना त्यांनी जाहीरपणे याची कबुली दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मंत्रीपद मिळावे यासाठी गोगावले आग्रही होते. पण अडीच वर्षात त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. मंत्रीमंडळ विस्तार होण्याची वाट पाहण्यात वेळ निघून गेली. सगळे प्रयत्न करून झाले आता माझ्या मंत्रीपदासाठी तुम्हीच देवाला साकडे घाला असा सल्ला त्यांनी गावाकऱ्यांना दिला होता. मंत्रीपद न मिळाल्याची खंत ते जाहीरपणे बोलत राहीले.
निवडणूकीच्या तोंडावर त्यांची महामंडळ देऊन बोळवण करण्यात आली. विधानसभा निवडणूक झाली. गोगावले पुन्हा एकदा महाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. मात्र नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात गोगावले यांना मंत्रीपद देण्यात आले. त्यांच्यावर रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
मंत्रीपदानंतर रायगडचे पालकमंत्रीपद मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र त्यांना डावलून आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपवले गेले. या निर्णयामुळे शिवसैनिकांचा संताप अनावर झाला. त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरत जाळपोळ केली. या उद्रेकामुळे चोविस तासांच्या आत आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पद देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली गेली. तेव्हा पासून रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. आज ना उद्या पालकमंत्री पद मिळेल या आशेवर गोगावले कायम आहेत. मात्र अनेक प्रयत्नानंतरही त्यांना पालकमंत्री पद मिळू शकलेले नाही. किंबहूना २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्टला जिल्ह्याच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्याची संधीही त्यांना देण्यात आलेली नाही. आदिती तटकरे यांनाच तिन्ही वेळेस हा मान देण्यात आला. त्यामुळे नाराज झालेल्या गोगावले यांनी १५ ऑगस्टला बिरवाडी ग्रामपंचायतीत जाऊन ध्वजारोहण केले होते.
मुख्यमंत्र्याकडून त्यांच्या नाराजीची फारशी दखल घेतली जात नसली तरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे या साठी गोगावले अजूनही आग्रही आहेत. त्यामुळेच त्यांनी रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी आता थेट गणरायालाच साकडे घातले आहे.
मी रायगडचा पालकमंत्री व्हावे हे जनतेच्या आणि माझ्याही मनात आहे. त्यामुळे आमचा आराध्य दैवत असलेल्या गणरायाकडे पालकमंत्रीपद मिळू दे यासाठी साकडे घातले आहे.- भरत गोगावले, रोजगार हमी मंत्री