रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोकणात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, या नेत्यांच्या कोकण दौऱ्यावरून भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये, अन्यथा येथील जनता त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. शनिवारी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?

खाशाबा जाधव एवढेसे होते. त्यांच्यासमोर भलेमोठे परदेशी पैलवान होते. मात्र, त्यांनी या पैलवांनाना पराभूत करून सुवर्णपदक मिळवलं. आमचे विनायक राऊतही तसेच आहेत. मी आज अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना सांगतो की तुम्ही कोकणात येण्याच्या भानगडीत पडू नका. इथे आलात तर कोकणातील जनता तुम्हाला कोकणच्या मातीचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, इशारा भास्कर जाधव यांनी दिला.

हेही वाचा – “पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्याविरोधात ठाकरे गटाने राणेंचे कट्टर विरोधक असलेल्या विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोकणातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. महत्त्वाचे म्हणजे, विनायक राऊत यांनी या मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. आता सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून ते विजयाची हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत.