विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे. यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीचे आमदार आक्रमक झाले होते. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं. त्यानंतर विधानपरिषदेमध्येही सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काही वेळासाठी कामकाज स्थगित केले होते. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झाले.

हेही वाचा : “..तर लाडांना चांगलाच ‘प्रसाद’ दिला असता”, अंबादास दानवे विधानपरिषदेतल्या राड्यानंतर पुन्हा आक्रमक

यावेळी भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात सभागृहात प्रस्ताव मांडला. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं. तसेच या पाच दिवसांमध्ये अंबादास दानवे यांना सभागृहात येण्यासंही बंदी असेल असंही सांगितलं.

विधानपरिषदेत ठराव मांडला त्यावेळी काय घडलं?

भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलबंन करण्याचा ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाकडून यावर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून यावर चर्चा करण्यास नकार देत अशा प्रस्तवावर चर्चा होत नाही, असं म्हटलं. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानपरिषदेतील गोंधळांवर दानवे काय म्हणाले?

“भारतीय जनता पार्टीने नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींना आणि १५० खासदारांना संसदेमधून निलंबित केलं होतं. त्यामुळे भाजपाने संसदीय भाषा आणि नियम, कायदे उद्धव ठाकरे यांना आणि मला शिकवण्याची गरज नाही. प्रसाद लाड हे राजकारणात नवीन आहेत. मला वाटतं या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करून काय होणार? त्यांनी न्यायालयात जावं. आता त्यांना काय करायचं ते करुद्या. कारण त्यांना कायदे आणि संविधान आता आठवायला लागले आहेत. आतापर्यंत भाजपाला कायदे म्हणजे त्यांच्या घरची जहांगिरी किंवा त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते. पण आता त्यांना कायद्याची जाणीव झाली हे चांगलं”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली होती.