नांदेड : अनपेक्षितपणे ताटातूट झालेले बिहारी कुटुंब नांदेडमध्ये एकत्रित आले आणि आनंदाच्या डोहात न्हाऊन निघाले. हरवणे आणि सापडणे, असा चित्रपटात शोभावा असा या कुटुंबाचा घटनाक्रम नोंद झाला. दुसऱ्या बाळंतपणानंतर मनःस्थिती बिघडलेल्या अवस्थेत चुकीच्या रेल्वेत बसून ममता (नाव बदलले आहे) वर्षभरापूर्वी थेट नांदेडमध्ये उतरली.

ओटीत एक महिन्याचे बाळ आणि बोटाला पाच वर्षांची मुलगी. तिला मराठी कळेना. तर इथे कुणाला बिहारी समजेना. दोन दिवस उपाशी फिरल्यानंतर एका सुहृदाने पोलिसांना खबर दिली. त्यांनी माय-लेकींना ताब्यात घेतले. ममताला येरवडा (पुणे) येथील रुग्णालयात पाठवले तर मुलींना येथेच शिशुगृहात दाखल केले. दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणात ‘श्रद्धा’ या स्वयंसेवी संस्थेचा प्रवेश झाला. त्यांचे प्रयत्न आणि ‘सबुरी’तून चार दिशांना विखुरलेले हे दुःखी कुटुंब बुधवारी एकत्र आले.

स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ममताला येरवडा येथे पाठवले. तर मुलींपैकी सोनीला लोहा येथील सावित्रीबाई शिशुगृहात दाखल केले गेले. नाव माहिती नसल्याने शिशुगृहाने तिचेही नामकरण केले. आणि मोठी रश्मीला (नाव बदलेले आहे) लोहा येथीलच नरसाबाई महिला मंडळाच्या शिशुगृहात दाखल करण्यात आले. येथेच तिला बाराखडी, पाढे इंग्रजीतून शिकवण्यास सुरुवात झाली होती. इकडे आई लेकरांविना तळमळत होती, तिच्या भावना संबंधितांना कळत होत्या, परंतु नाईलाज होता. येरवडा येथे तिच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार झाले.

रुग्णालय व्यवस्थापनाने नंतर कर्जत (जि. रायगड) येथील डॉ. भरत वटवानी या मानसोपचार तज्ज्ञाने स्थापन केलेल्या ‘श्रद्धा पुनर्वसन केंद्रा’कडे हे प्रकरण सुपूर्द केले. या संस्थेने ममताची भाषा जाणणाऱ्या दुभाषीला शोधून त्यांचे मूळ गाव चंपारण शोधून काढले. पती-पत्नीची भेट हृदयस्पर्शी होती, असे या संस्थेचे सदस्य डॉ. प्रथमेश हेमवानी यांनी येथे सांगितले. याच पथकाने पती शंकरलाल (नाव बदलले आहे) आणि ममताला घेऊन नांदेड गाठले.

उभयतांसह ‘श्रद्धा’च्या पथकातील सदस्य डॉ. हेमवानी व नीलम शिरसाट हे नांदेड येथील बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. रजवंतसिंघ, सदस्या रेखा तोरणेकर, संगीता कांबळे, किशोर नावंदे यांच्यासह लोहा येथे पोहोचले. तिथे आई-वडिलांची दोन कन्यांसोबत भेट झाली. दोघांनाही अत्यानंद झाला. गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी चौघांनाही पाटणा येथे जाणाऱ्या रेल्वेत बसवूनच ‘श्रद्धा’चे पथक कर्जतला परतले.

माणुसकी जीवंत आहे !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘श्रद्धा’ संस्थेने हे प्रकरण अत्यंत सबुरीने हाताळले. त्यांच्यातील माणुसकीमुळे गेल्या २३ वर्षांत वेडाच्या भरात हरवलेल्या ११ हजार जणांना कुटुंबाच्या स्वाधीन केले गेले आहे. या संस्थेने या परिवाराला आवश्यक त्या वस्तुंसह पाटण्याला रवाना करतानाही माणुसकीचे सर्व उपचार पाळले.