सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय तपासातून ज्या गोष्टी, सत्य समोर येत आहे, ते आधीच झालं असतं तर पुरावे नष्ट झाले नसते असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सुशांत प्रकरणी येणारे खुलासे आश्चर्यचकित करणारे आहेत असं सांगताना फडणवीस यांनी भाजपाच्या कोणत्याही नेत्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंचं नाव घेतलेलं नाही असं सांगितलं आहे. पुण्यातील बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“सुशांत प्रकरणी येणारे खुलासे आश्चर्यचकित करणारे आहेत. सीबीआय येईपर्यंत हे खुलासे का झाले नाहीत हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. वेगवेगळे जे प्रश्न उभे राहिले आहेत त्याची उत्तर देण्याची आवश्यकता आहे. ४० दिवसांनी सीबीआय आलं आहे. ४० दिवसात पुरावे नष्ट झाले असतील तर..”, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा- सुशांत प्रकरणी भाजपानं कधीही आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं नाही : देवेंद्र फडणवीस
“हार्ड डिस्क नष्ट कऱण्यात आल्याचं मला माध्यमांकडून कळालं. अशा ज्या गोष्टी येत आहेत त्यातून मुंबई पोलिसांवर काय दबाव होता? काय अडचण होती? कोणत्या राजकीय दबावात ते होते की त्यांनी याची तपासणी केली नाही असे प्रश्न मात्र निश्चित उभे राहत आहेत. सीबीआय जे काही सत्य आहे ते समोर आणेल. पण हे आधीच केलं असतं तर तर पुरावे नष्ट झाले नसते. लवकर आपल्याला काय घडलं आहे किंवा कोण आरोपी आहे हे कळलं असतं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.