नांदेड : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह महिला सक्षमीकरणाचा मोठा गाजावाजा करणार्‍या महाराष्ट्र प्रदेश भाजपाने पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या बाबतीत महिलांची उपेक्षा केली आहे. गेल्या मंगळवारी या पक्षाने ५८ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली, त्यात केवळ दोन महिला आहेत.

महाराष्ट्रात भाजपाचे ८८ संघटनात्मक जिल्हे असून तेथील जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी पक्षाने दीर्घ प्रक्रिया राबविली. या पदांच्या निवडीसाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अर्हता आणि निकष ठरवून दिले होेते. महिलांना जिल्हाध्यक्षपदी संधी द्यावी तसेच उपेक्षित जाती-जमातींतील कार्यकर्त्यांची नावे विचारात घ्या, असेही कळविण्यात आले होते.

भाजपाच्या कार्यकर्त्यांना बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागल्यानंतर ५८ संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर झाली. या यादीत श्रीमती रोहिणी तडवळकर (सोलापूर शहर) आणि डॉ.आरती फुफाटे (पुसद) या दोन महिलांचा समावेश आहे.

पक्षाने मराठवाड्यातील ८ जिल्हाध्यक्षांची नावे पहिल्या यादीत जाहीर केली; पण त्यांत एकही महिला नाही. भाजपाने मराठवाड्यात तिघांना मंत्रिमंडळात स्थान दिले, त्यात पंकजा मुंडे व मेघना बोर्डीकर या दोन महिलांचा समावेश असला, तरी पक्ष संघटनेमध्ये मराठवाड्यात आजवर कधीही महिलेला जिल्हाध्यक्षपदाची संधी देण्यात आली नसल्याचे पक्षाच्या एका आमदाराने सांगितले.

मराठवाड्यात नांदेड ग्रामीणचे दोन, परभणी ग्रामीण, औरंगाबाद महानगर, लातूर महानगर आणि ग्रामीण, बीड ग्रामीण इत्यादी जिल्हाध्यक्षांची निवड अद्याप झालेली नाही. इतर जिल्ह्यांमध्ये इच्छुकांत महिला आहेत किंवा कसे, ते कळाले नाही, पण नांदेड दक्षिण जिल्ह्याच्या संभाव्य नावांमध्ये पक्षाच्या माजी जि.प.सदस्य पूनम राजेश पवार यांचे नाव स्थानिक स्तरावरून वरपर्यंत गेले आहे. पक्ष त्यांचा विचार करणार का, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी पहिल्या यादीत आपले समर्थक अमरनाथ राजूरकर यांची नांदेड महानगराध्यक्षपदी वर्णी लाऊन घेतली. नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदावरही आपल्या समर्थकांची नियुक्ती व्हावी, यासाठी ते आग्रही आहेत, असे सांगण्यात आले.

नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी बर्याच नावांची चर्चा झाली. पक्षाने जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्षांत किमान एका महिलेला संधी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असून नांदेड (द.) जिल्ह्यात पूनम पवार व प्रणिता चिखलीकर-देवरे असे दोन पर्याय पक्षाकडे आहेत. या दोघींनाही मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे.