भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा टोला
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तूर्त तरी होणार नाही आणि मीही प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत मंत्री होणार नाही, असे स्पष्ट करतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या धमक्यांना भाजप घाबरत नाही, त्यांच्या इशाऱ्याचा सरकारवर काही परिणाम होत नाही, असेही टोला लगावला.
नगरसेवक किशोर डागवाले व महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष दानवे येथे आले होते, त्या वेळी ते सरकारी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील सत्तेत सहभागी असूनही शिवसेना रोज सरकारला इशारे देत आहे, धमक्या देत आहे, याकडे लक्ष वेधले असता, दानवे यांनी सरकार स्थिर आहे, या इशारे व धमक्यांचा सरकारवर, भाजपवर काही परिणाम होत नसल्याचे, त्यांच्या इशाऱ्यांना घाबरत नसल्याचे स्पष्ट केले. कसे वागावे हा त्यांचा प्रश्न आहे, असेही दानवे म्हणाले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्ष प्रवेशाचा प्रश्न दानवे यांनी दुर्लक्षित केला, हे राणे यांनाच विचारा, तेच सांगू शकतील, असे ते म्हणाले. शिर्डीला दर्शनासाठी मंत्र्यांच्या भेटी होऊ लागल्या आहेत, याचा अर्थ मंत्रिमंडळ विस्तार होणार का, या प्रश्नावर दानवे यांनी तूर्त राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, मीही प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत मंत्री होणार नाही, असे उत्तर दिले. भाजप कर्जमाफीच्या विरोधात नाही परंतु त्याऐवजी पायाभूत सुविधा देऊन शेतीत शाश्वत गुंतवणूक करून वीज, पाणी, शेतमाल बाजारात पाठवण्यासाठी रस्ते तयार करण्यावर भर दिला जाणार आहे, त्यातून पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, असे धोरण स्वीकारले जाणार आहे, असे दानवे म्हणाले. एक लाखावरील कर्जदार शेतक ऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे, त्यामुळे शेतक ऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आशा पल्लवित झाल्या आहेत, याकडे लक्ष वेधले असता, दानवे म्हणाले, की कोणत्या राज्यात नवे मॉडेल होत असेल, तर त्याचा अभ्यास केला जात आहे.