राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली असून सीबीआयनंतर आता सक्तवसुली संचलनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सीबीआयने अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द केला जावा अशी मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अनिल देशमुखांचा तपास ED कडे गेला हे उत्तमच, आता….”

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला आहे. “ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुखांना बदनाम करण्याचं हे कारस्थान – नवाब मलिक
अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा हा राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी केला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणात न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. हे सगळं त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे असे नवाब मलिक यांनी सांगितले.

“केंद्रातील भाजपा सरकार सर्व केंद्रीय एजन्सींचा वापर करून राजकारण करतेय हे स्पष्ट आहे. त्याच पध्दतीने ईडीने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा राजकीय हेतूने आणि आघाडी सरकारला, पक्षाला बदनाम करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ज्या काही कायदेशीर बाबी असतील त्या तपासाला अनिल देशमुख सहकार्य करतील”, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp kirit somaiya on ncp anil deshmukh shivsena anil parab sgy
First published on: 11-05-2021 at 18:23 IST