मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुराता रेशमीबागेतील संघ कार्यलयास भेट दिली. यावरून शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“मुख्यमंत्री रेशीमबागेत गेले त्याचा त्रास संजय राऊत यांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली. काँग्रेस, नवाब मलिक, अस्सलम शेख यांची संगत आणि याकूबच्या थडग्यावर रोषणाई करणाऱ्यांना असा त्रास, मळमळ, जळजळ होणारच!” असं शेलारांनी ट्वीटद्वारे म्हटलं.
याचबरोबर, “हिंदूना सडके म्हणणारा सर्जिल उस्मानी तुम्हाला प्रिय, दाऊद बरोबर व्यवहार करणारे तुमचे लाडके, म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाव ठेवणारे, रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके!!” अशा शब्दांत आशिष शेलारांनी टीकाही केली आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते? –
“रेशीमबागला जाणे चुकीचं नाही, हिंदुत्त्ववादी विचारांची संघटना आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जोड्यानं जात असतील तर आनंद आहे. काही दिवसांनी ते सभागृहात खाकी पॅन्ट घालून आले तरी मी त्यांचं स्वागत करेन.” असा खोचक टोला संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना लगावला होता.
