मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाकडूनही यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट करत राज्यपाालांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे म्हटले आहे.

हेही वाचा – “महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट”; पदावरून हटवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

काय म्हणाले आशिष शेलार?

”राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसांच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो”, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते राज्यपाल?

शुक्रवारी (२९ जुलै) जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.