कोरोना आणि लाँगडाऊनमुळे प्रत्येकाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची फी वाढ शासनाने रोखावी. तसंच सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि आयजीसीएससी शाळांच्या फी मध्ये कमीतकमी १० टक्क्यांची सुट द्यावी, अशी मागणी भाजपा नेते अॅड. आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एक पत्र लिहिलं आहे.

“राज्यातील अनेक शाळा १० ते ३० टक्क्यांपर्यंत तर काही शाळा त्यापेक्षा अधिक फी वाढ करत आहे. काही शाळांनी ही फी वाढ लागूही केली आहे. अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आर्य विद्या मंदिर या संस्थेने २० टक्के फी वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन करुन शाळेमधे फी वाढ लागू केली जात असल्याचा आरोप एमईटीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पालकांनी आहे,” असं शेलार यांनी पत्रात नमूद केलं आहे. “मोठ्या शिशूतील विद्यार्थ्यांकडून अधिक फी आकारुन पहिलीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेण्यास सांगितले जाते आहे. ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.

फी वाढीच्या अनेक तक्रारी
“मुंबईच्या इतर बऱ्याच शाळांमधील पालक फी वाढीच्या अशाच तक्रारी करत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लाखो विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलावीत,” अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी या पत्रात केली आहे.

फी मध्ये १० टक्के सवलत द्या
“करोनाचा आर्थिक फटका समाजातील सर्वच घटकांना बसला असल्याने या शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयबी, आयसीएसई, आयजीएससीई यासह सर्व शाळांना येत्या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही प्रकारे फी वाढ करण्यात येऊ नयेत, असे निर्देश शासनाने द्यावे. तसंच सध्याची स्थिती पाहता शाळांनी यावर्षी कमीतकमी १० टक्के फी कमी करावी,” असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

आवश्यकता भासल्यास निर्देश द्या
“करोनामुळे यावेळी शैक्षणिक वर्षे उशिरा सुरु होणार आहे. अनेक शाळांनी ऑनलाईन शाळा सुरु केल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी शाळांना करावा लागणारा वीज बिल व अन्य शैक्षणिक सेवासुविधांवरील प्रत्यक्ष खर्च कमी होणार आहे. त्यामुळे शाळांनी पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यांना फी मधे सवलत देण्यासाठी पुढाकार घ्यावा, शासनाने यासाठी आवाहन अथवा आवश्यकता भासल्यास तसे निर्देश द्यावे,” अशी विनंतही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.