सध्या राज्यावर करोनाचं सावट आहे. मात्र करोनाचं संकट संपल्यानंतर काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीवर ते बोलत होते. करोनाचं संकट संपल्यानंतर देशामध्ये तसंच राज्यातही काँग्रेसमध्ये अनेक भूकंप होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

“करोना संकट संपल्यानंतर देशात तीन तर महाराष्ट्रात असंख्य भूकंप होणार आहेत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली. “बाळासाहेब थोरात तुम्ही सांभाळा, तुमचा पक्ष जपा, तुम्हाला कुठेही भवितव्य नाही,” असा इशारा पाटील यांनी दिला. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी क्रॉस व्होटिंगची काँग्रेसची ऑफर होती असा दावा केला होता. यावरही पाटील यांनी भाष्य केलं. “राजघराण्यातील जोतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसला जपता आलं नाही. तर इतरांना काँग्रेस काय सांभाळणार,” असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीकेचा बाण सोडला.

आणखी वाचा- “१०५चे पन्नास व्हायला उशीर लागणार नाही; सामाजिक समीकरणात पंकजा मुंडे, बावनकुळे बसत नव्हते का?”

चार तिकीटं ४० इच्छुक

“भाजपानं मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारलं होतं. यावरही पाटील यांनी भाष्य केलं. चार तिकिटं असताना ४० जणं इच्छुक अशी स्थिती आहे. त्यामुळे काही जणांना न्याय मिळतो. त्याचवेळी काही जणांवर अन्यायही होतो,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- पक्षातील स्पर्धक कमी व्हावा म्हणून मला वारंवार छळलं गेलं – एकनाथ खडसे

संघाच्या अजेंड्यात नाथाभाऊ बसले नाहीत
“भाजपा हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन काम करतो. आमच्या अजेंड्यामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा आमच्या अजेंड्याचा भाग आहे. केवळ घरामधल्यांना मोठं करणं हा आरएसएसचा अजेंडा नाही,” असं सांगताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना तिकीट का नाकारण्यात आलं याची कारणमीमांसा केली आहे.