scorecardresearch

“बारामतीचा शरद पवार नावाचा माणूस…” एकेरी उल्लेख करत गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका!

भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली आहे.

“बारामतीचा शरद पवार नावाचा माणूस…” एकेरी उल्लेख करत गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका!
गोपीचंद पडळकर व शरद पवार (संग्रहित फोटो)

भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी नुकतीच सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातून पडळकरांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीकास्र सोडलं आहे. बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस धनगर समाजाचा वैचारिक शत्रू आहे, अशी टीका पडळकरांनी केली आहे.

धनगर समाजाला उद्देशून केलेल्या भाषणात पडळकर म्हणाले, “राज्यात जिथे मेंढपाळ जातील, तिथे त्यांना मारहाण होतेय. काहीही कारण नसताना त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. धनगर समाजाचे सगळे विषय आता मी समजून घेत आहे. आता केवळ राजकीय विषय बाकी आहे. राजकारण आणि सत्ताकारणात तुम्ही सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचा वैचारिक शत्रू बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस आहे, हे लक्षात ठेवा.”

हेही वाचा- “…तर उद्याच सरकार कोसळेल” एकनाथ खडसेंच्या विधानावर गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, आपल्यातील काही लोकं उद्घाटन आणि जयंतीच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी शरद पवार हेलिकॉप्टरमधून आले होते. दरम्यान, आपल्यातील सर्वजण डोक्यावरील टोपी खाली पडेपर्यंत हेलिकॉप्टरकडे पाहत… साहेब आले… साहेब आले… असं म्हणत ओरडत होते. पण त्यांना सांगू इच्छितो की, त्या हेलिकॉप्टरमध्ये तुमचा साहेब नाही तर, बहुजनांचा कर्दनकाळ बसला आहे.

हेही वाचा- खडसेंना तीन तास ऑफिसबाहेर बसवून अमित शाहांनी भेट नाकारली? गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं

तुम्ही अशा भानगडी करू नका. तुम्हाला जर परिवर्तन घडवायचं असेल तर एकदम ठासून काम करावं लागेल. वैचारिकपणे पुढे जावं लागेल. दसरा मेळावा हे काही राजकारणी लोकांचं काम नाही. तुम्ही सर्वांनी दरवर्षी एकत्र यायला हवं. तुम्ही मला खाली बसवा, मी खाली बसायला तयार आहे. दुसऱ्याला बोलायला व्यासपीठावर बोलवा. आरेवाडीचा दसरा मेळावा हा महाराष्ट्राचं परिवर्तन केंद्र बनू शकतं. येथे केवळ एकाच समाजाची लोकं येत नाहीत. इथे मराठा समाजासह बहुजन, अठरापगड जातीची आणि बारा बलुतेदारांची लोकं येतात. आरेवाडी हे एक शक्तीकेंद्र बनतंय, असंही पडळकर यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या