महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंब आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. दीपक केसरकर यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत राणे कुटुंबासोबत आपला वैयक्तिक वाद नसून आपण त्यांच्यासोबत काम करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. केसरकर यांच्याकडून मैत्रीचा हात पुढे केल्यानंतरही भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

त्यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, “दीपक केसरकर आमच्यासोबत काम करायला तयार आहेत, म्हणजे आम्ही त्यांना थांबवत होतो की काय? दीपक केसरकर कधी येणार आणि आमच्यासोबत ते कधी काम करणार… ते स्वत: ला खूपच महत्त्व देत आहेत. एवढं महत्त्व त्यांचं कधीच नव्हतं. आता तेही शिल्लक राहिलेलं नाही. दीपक केसरकर यांनी स्वत:ची लायकी आधी ओळखून घ्यावी. मला तर वाटतंय त्यांना कसलातरी मानसिक रोग झाला आहे. ते कधी ठाकरे कुटुंबाबाबत चांगलं बोलतात, तर दुसऱ्याच दिवशी ते त्यांच्याविरोधात काहीतरी बोलतात. त्यांचा वरचा मजला रिकामा झाला आहे किंवा काहीतरी गडबड झाली आहे” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

हेही वाचा- उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा मैत्री होईल? फ्रेंडशिप दिनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “दीपक केसरकर तुम्ही लायकीत राहायला शिका, तुमची लायकी काय आहे, हे मागच्यावेळी सांगितलं होतं. आता त्याबद्दल काही बोलणार नाही. पण नख लावला तर तुम्हाला फाडून टाकणार, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आमच्या भानगडीत पडू नका. तुमची इकडे काय लायकी आहे, हे कदाचित तुम्हाला मुंबईत माहीत नसेल. पण मतदारसंघात तुमची काय लायकी आहे? हे मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका. आम्ही कधी ठाकरेंचं ऐकलं नाही. तर तुमचं ऐकणं तर सोडूनच द्या. तुम्हाला आम्ही गिनतीतही घेत नाही.”