Nitesh Rane on Aditya Thackeray: पावसाला सुरुवात होताच मुंबईत अनेक ठिकाणी नाले तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. नाले तुंबल्यामुळे रस्त्यावरच पाणी साचून राहत आहेत. याचा मनस्ताप स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहेत. या मुद्द्यावरून आता भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांनी एक ट्वीट केलं असून आदित्य ठाकरे यांनी ठेकेदारांच्या फायद्यासाठी मुंबईला भ्रष्टाचाराची गटारगंगा केली, असा आरोप केला आहे.

संबंधित ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणाले की, “देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या आपल्या मुंबईला आदित्यसेनेनं ठेकेदारांसाठी भ्रष्टाचाराची गटारगंगा केली आहे.” यासोबत नितेश राणे यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेली विधानं कशी फोल ठरली आहेत, याची तुलना केली आहे. मुंबईतील अनेक रस्त्यावर पाणीसाचून नागरिकांना त्रास होत असलेलं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओच्या माध्यमातून देखील त्यांनी आदित्य ठाकरेंवर टोलेबाजी केली आहे. “पहिल्याच पावसाने केली मनपाची पोलखोल, नालेसफाईच्या कामात झालाय झोल, टक्केवारी वीरांनी मुंबईकरांचे ५ हजार कोटी बुडवून दाखवले, कंत्राटदार आले पैशात न्हाऊन, मुंबईकर गेला पावसात वाहून, मुंबईची तुंबई करून दाखवली.” अशी वाक्य वापरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.