Pankaja Munde : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (९ फेब्रुवारी) नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं होतं. “गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं. मात्र, यानंतर आता पंकजा मुंडे यांनी त्यांच्या विधानासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “आता त्या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो अर्थ तसा निघणार नाही”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडेंनी काय स्पष्टीकरण दिलं?

“नाशिकमध्ये एक गिरासे म्हणून डॉक्टर आहेत. त्यांनी माझ्याआधी भाषण केलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप प्रेम करायचो. त्यांना अनेकदा भेटायचो. तेव्हा ते म्हणाले ताई तुम्हाला माहिती आहे का की गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक एवढे आहेत ते मोजायला गेलं तर एक पक्ष निर्माण होईल असं ते म्हणाले. त्यांच्या विधानाला उत्तर देताना मी म्हटलं की, हो पक्ष निर्माण झालाच आहे. आता या पक्षाशी (भाजपा) देखील त्यांच्यावर (गोपीनाथ मुंडे) प्रेम करणारे लोक जोडले गेलेलेच आहेत. आता आता त्या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो अर्थ तसा निघणार नाही”, असं पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

पंकजा मुंडेंनी काय विधान केलं होतं?

“गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. “तसेच गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्यावर प्रेम करणारे हे सर्व लोक गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. लोक गुणांचा वारसा स्वीकारतात. गुणांवर प्रेम करतात. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभा आहे. भारतीय जनता पक्षाच्या जन्मापासून गोपीनाथ मुंडे यांनी काम करून पक्ष उभा केला”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“कोणीही स्वतंत्र पक्ष काढू शकतं. आता पंकजा मुंडे म्हणतात त्या प्रमाणे मोठा पक्ष असेल. मात्र, माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्यावर यश मिळवणं हे कितपत यशदायी असेल याची मला कल्पना नाही. मग कोणताही समाज असो आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत. वेगवेगळ्या घटकांनी वेगवेगळे पक्ष काढलेत. मग ते किती चालले किती नाही याचा लेखाजोखा त्यांनी घेतला पाहिजे. याचा अभ्यास त्यांनी केला असेल. पंकजा मुंडे यांनी म्हटलं असलं तरी त्या लगेच पक्ष काढतील असं मला तरी काय वाटत नाही. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊ या की दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.