Radhakrishna Vikhe on Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघामधून डॉ. सुजय विखे यांचा पराभव झाला. त्यामुळे डॉ.सुजय विखे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत काही दिवसांपूर्वी सूचक विधान केलं होतं. डॉ.सुजय विखे यांनी राहुरी किंवा संगमनेर हे पर्याय आपल्यासमोर असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ.सुजय विखे यांच्यावर बोचरी टीका केली.

“मुलाचा छंद असेल तर तो पुरवला पाहिजे”, अशी खोचक टीका बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांच्यावर केली. त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पलटवार केला आहे. “आमच्या मुलाचा छंद पुरवायचा की नाही हे तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही”, असं प्रत्युत्तर विखे पाटील यांनी थोरातांना दिलं आहे.

हेही वाचा : Jayant Patil : एनडीए सरकारबाबत जयंत पाटील यांचं मोठं विधान; म्हणाले, “दिल्लीत महिनाभरात राजकीय…”

राधाकृष्ण विखे काय म्हणाले?

“आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आता तुम्हीही तुमचं सर्व घरदार राजकारणात उतरवलं आहेच ना? मग तुमच्या घरातील मुलं राजकारणात आले तर चालतात. तुमच्या मुलाचा छंद पुरवलेला चालतो, मग दुसऱ्याच्या मुलाची कशाला काळजी करता?”, अशी खोचक टीका करत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर पलटवार केला.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?

“मोठ्यांचं ते लाडकं लेकरू आहे. त्यामुळे मुलाचा छंद असेल तर तो पुरवला पाहिजे. या मताचा मी आहे. पक्षाने नाही तर पालकानी मुलांचा छंद पुरवला पाहिजे. आता ते दोन ठिकाणी उमेदवारीबाबत बोलले आहेत. त्यामुळे मुलाचा छंद पुरवण्यासाठी ते एकाचवेळी दोन्ही ठिकाणी उभे करु शकतात. त्यामुळे बालकाचा छंद पूर्ण होईल”, अशी बोचरी टीका बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांच्यावर केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ.सुजय विखे काय म्हणाले होते?

“आता मला वेळ आहे. त्यामुळे शेजारी कुठं संधी मिळाली तर विधानसभा लढवण्याचा प्रयत्‍न आहे. संगमनेर आणि राहुरी हे माझ्यासमोर पर्याय आहेत”, असं विधान माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी केलं होतं.