लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. मात्र, महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. महायुतीला कमी जागा मिळाल्यामुळे महायुतील मोठा धक्का बसला. मात्र, यानंतर आता महायुतीच्या जागा का कमी निवडून आल्या? यावर भारतीय पक्षाच्या नेत्यांकडून विचारमंथन करण्यात येत आहे. या लोकसभा निवडणुकीत काही दिग्गज नेत्यांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचाही समावेश आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून रावसाहेब दानवे निवडणुकीत मैदानात होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत डॉ.कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना धक्का बसला. परभवानंतर रावसाहेब दानवे यांनी सूचक भाष्य केलं.

हेही वाचा : लोकसभेच्या निकालाबाबत आशिष शेलारांचं मोठं विधान; म्हणाले, “शरद पवारांनाही चार जागा…”

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

“राज्याच्या राजकीय वातावरणात बदल झाल्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला आहे. माझ्या मुलाच्या विधानसभा मतदारसंघात देखील मला कमी मताधिक्य मिळालं. मग त्यात माझ्या मुलाने माझ्या विरोधक काम केलं असं म्हणू का? त्यामुळे कुणालाही दोष देता येणार नाही. एकूणच राज्यात राजकीय वातावरणात बदल झाला आहे, त्याचा फटका पक्षाला बसला. निवडणुकीत पराभवाची वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच आम्ही कष्ट करून बाजी मारू”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

मतदारसंघाचा दौरा सुरु

“लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यामुळे काही ठिकाणी कार्यकर्ते खचून गेल्याचं दिसून आलं. मात्र, कार्यकर्त्यांना या अपयशातून बाहेर काढण्यासाठी मी आता मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. यामध्ये १३तारखेला अंबड, पैठण आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व विधानसभेचा दौरा करणार आहे. आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी विभागानुसार बैठका घेणार आहे. या निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कष्ट करून मेहनत घेतली, मात्र अपयश आलं”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्तारांच्या कार्यक्रमाला मी जाणार

रावसाहेब दानवे पराभूत झाले तर मी माझी टोपी उतरवेन, असा शब्द अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांसमोर दिला होता. आता दानवे पराभूत झाल्यामुळे सत्तार टोपी कधी काढणार? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. यावर सत्तार म्हणाले, “एक भव्य कार्यक्रम आयोजित करून आजी-माजी खासदारांसमक्ष, एक लाख लोकांच्या उपस्थितीत मी टोपी उतरवणार आहे.” दरम्यान, यावर आता रावसाहेब दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “अब्दुल सत्तारांच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला मी नक्की जाणार आहे. माझा पराभव झाल्याचा आनंद सत्तारांना होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे”, असा टोला त्यांनी लगावला.