विधानसभा अधिवेशनचा आज दुसरा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकरांचा विजय झाल्यानंतर आज बहुमत चाचणीतही फडणवीस-शिंदे सरकारचा विजय झाला आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील तुम्ही इकडून तिकडे गेला नाहीत, म्हणून उपमुख्यमंत्री झाला नाहीत, असा टोला मुनंगटीवारांनी लगावला आहे.

अजित पवारांचे मानले आभार
अभिनंदन विश्वसादर्शक प्रस्तावादरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये सत्ता गेल्याची वेदना आम्ही बघत होतो. मात्र, शिंदे आणि भाजपा सरकारची सत्ता आणण्यासाठी अजित पवारांनीही प्रत्यक्ष-अप्रत्य़क्षपणे मदत केली त्यामुळे त्यांचेही धन्यवाद, असा खोचक टोलाही मुनगंटीवारांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीतील अर्धे लोक रात्री आमची भेट घेतात
इकडून तिकडे गेल्याने कोणी पराभूत होत नाहीत. तुम्ही गेला नाहीत म्हणून उपमुख्यमंत्री झाला नाहीत. आता मनामध्ये पक्का विचार ठेवा. कधीतरी अशी उडी मारावी लागते. राष्ट्रवादीतील अर्धे लोक रात्री आमची भेट घेतात. कधी कोणी इकडे येईल तुमच्यासकट सांगता येत नाही, असा टोलाही मुनगंटीवारांनी जयंत पाटलांना लगावला आहे.

‘मी पुन्हा येईन’ वाक्यावरुन टिंगटटवाळी करणाऱ्यांना फडणवीसांचे उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन वाक्यावरुन टिंगटटवाळी करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असं म्हटल्यानंतर अनेकांनी माझी टिंगलटवाळी केली. मी पुन्हा येईन म्हटलं होतं. मी पुन्हा आलोच नाही तर यांनाही घेऊन आलो आहे. ज्यांनी अपमान, टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार. मी त्यांना माफ केलं हाच माझा बदला आहे. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. सर्वांना संधी मिळते,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.