या वर्षीचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच वादळी ठरतंय. वीजतोडणी, विरोधकांना फसवण्याचा डाव अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडत आहेत. तर सत्ताधारीदेखील विरोधकांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तरं देत आहेत. आज मात्र माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं या मागणीला घेऊन सभागृह दणाणून सोडलं. या कामासाठी केंद्र सरकारची काही मदत लागत असेल तर मी स्वत: सोबत येईल असे आश्वसन देत औरंगाबादचं नाव बदलून लवकरात लवकर संभाजीनगर करावं अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत आनेक ठिकाणांची नावे बदलली

यावेळी बोलताना “आपल्यासाठी काही लोक प्रेरणा देणारे असतात. उर्जा देणारे असतात. यापैकी एक म्हणजे संभाजी राजे महाराज हे आहेत. आज त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा दिवस आहे. या निमित्ताने मी त्यांचे स्मरण करतो. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं. नाव बदलण्यासाठी एक प्रोसोस असते. ही पूर्ण प्रोसेस ४ मार्च २०२० रोजी पूर्ण झाली. आपण अनेक नावं बदलले. विमानतळाचे नाव बदलले. दिल्लीत औरंगजेब मार्गाचे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम असे करण्यात आले. म्हणून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी,” असे मुनगंटीवार म्हणाले.

पदं, खुर्च्या आयुष्यभर नाहीयेत

तसेच पुढे बोलताना सुधीर मुनंगटीवार यांनी संभाजी महाराज यांनाही खुर्चीवर प्रेम करता आलं असतं पण त्यांनी तसं केलं नाही, असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला, “धर्मवीर संभाजी राजे यांना चाळीस दिवस त्रास देण्यात आला. केस काढण्यात आले. डोळ्यात गरम लोखंडी सळ्या टाकण्यात आल्या. नखं काढण्यात आले. तरीही हा छावा म्हणतो कितीही अत्याचार कर मी धर्मवीर आहे. मी धर्मांतर करणार नाही. जीव गेला तरी चालेल. त्यांनाही खुर्चीवर प्रेम करता आलं असतं. सत्तेसाठी लाचार होता आलं असतं. औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर तीन अटी ठेवल्या होत्या. पण संभाजी महाराज म्हणाले अशा खुर्च्या मी आगीमध्ये भस्मसात करुन टाकेल. हे पदं, खुर्च्या आयुष्यभर नाहीयेत,” असे मुनगंटीवार म्हणाले. तसेच मी संसदीय कामकाज मंत्री अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की आज आपण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची घोषणा करावी,” असेही मुनगंटीवार म्हणाले.

…तर आयुष्यभर निवडणूक लढवणार नाही

तसेच औरंगाबादचं नाव बदलण्यासाठी मी जी मदत लागेल ती करायला तयार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. “या विषयावर तुम्हाला केंद्राची मदत लागत असेल तर मी स्वत: तिथे मुक्काम करेल. केंद्राने अनुमती दिली नाही तर आयुष्यात निवडणूक लढवणार नाही,” असं मुनगंटीवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader sudhir mungantiwar demands change name of aurangabad city to sambhaji nagar prd
First published on: 15-03-2022 at 16:49 IST