भाजपाने लोकसभा उमेदवारांची १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा महाराष्ट्रातील काही नेत्यांचे मुद्दामहून खच्चीकरण करत असल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाने केला. याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही तोफ डागली होती. आता त्यांच्या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेले आहे. ते रोज काहीही बडबडतात. अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते”, अशा शब्दात भाजपाने टीका केली.

नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंकडून प्रस्ताव; म्हणाले, ‘दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा’

संजय राऊतांमुळे मविआचे जागावाटप रखडले

भाजपा महाराष्ट्रच्या एक्स अकाऊंटवर एक दीर्घ पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये संजय राऊत यांचा घरगडी असा उल्लेख करण्यात आला. या पोस्टमध्ये लिहिले की, “महाविकास आघाडीचे जागा वाटप अडलेले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहेत. या भांडणाचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत, ते आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचा अपमान करतात. त्यांना धमकावतात. नेत्यांवर चिडचिड करूनही त्यांचे मन शांत होत नाही. म्हणून मग ते बैठकीत चहा देणाऱ्या वेटरवर खेकसतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत.”

संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळले

“काल राऊत यांनी प्रकाश जी आंबेडकर यांना ‘ हट्ट करू नका‘ असा इशारा देत त्यांचा अपमान केला. एकूणच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे आणि त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे. आज संजय राऊत यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. पण राऊत हे विसरले आहेत की, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो”, अशी टीका या पोस्टमध्ये करण्यात आली आहे.

“भाजपाच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचं नाव नाही, पण बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्या..”, उद्धव ठाकरेंचा टोला

उबाठा गठात घरकोंबडा बाप-मुलालाच पदे मिळतात

संजय राऊत ज्यांची चाकरी करतात, त्या उबाठामध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याचा ३३ वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो. नितीन गडकरी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. नितीन गडकरी यांचे कर्तुत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्यासारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये, अशी टीका भाजपा महाराष्ट्रच्या एक्स अकाऊंटवर करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत काय म्हणाले होते?

भाजपाला निवडणुकीनंतर अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही. भाजपाला २२० ते २२५ च्या पुढे जागा जिंकणार नाही. अशावेळी नितीन गडकरी यांचे पंतप्रधानपदी कुणी नाव पुढे करू नये, यासाठी आताच त्यांचा दिल्लीतील पत्ता कट करण्याचे काम केले जात आहे. नितीन गडकरी हे व्यासपीठावरदेखील सन्मानाने उभे असतात. महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या नेत्याला अपमानित करायचं, डावलायचं, असा प्रयत्न आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.