कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेतं नाही. आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून येईल, असं विधान केलं होतं. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘मनोरंजनाच्या दृष्टीनं या वक्तव्यांकडे पाहिलं पाहिजे’, असं म्हणतं गणपत गायकवाड यांना लक्ष्य केलं होतं. आता गणपत गायकवाडांनी श्रीकांत शिंदेंवर ‘गद्दार’ म्हणत अप्रत्यक्षपणे घणाघाती टीका केली आहे.
वादाला सुरूवात कुठून झाली?
राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील विजयानंतर गणपत गायकवाडांनी कार्यकर्त्यांबरोबर जल्लोष केलं. त्यानंतर बोलताना गणपत गायकवाड म्हणाले, “कल्याण-भिवंडी मतदारसंघात लोकसभेला जे भाजपाचे उमेदवार उभे राहतील, ते निवडून येतील.”
यावर विधानावर बोलताना श्रीकांत शिंदेंनी म्हटलं, “कोण कुठून लढणार हे ठरविण्यासाठी वरिष्ठ सक्षम आहेत. वक्तव्य केल्याशिवाय प्रसिद्धी मिळणार नाही, हे काहींना माहिती आहे. मनोरंजनाच्या दृष्टीनं या वक्तव्यांकडे पाहिलं पाहिजे. यापूर्वीही अशी वक्तव्ये करण्यात आली होती. पण, ती मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. कुणी टीका केली, तर त्यांच्यावर टीका करण्यास मला वेळ नाही. आपला वेळ जनतेसाठी वापरला पाहिजे.”
श्रीकांत शिंदेंच्या विधानाला गणपत गायकवाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एक्स’ एकाउंटवर ट्वीट करत गणपत गायकवाड म्हणाले, “ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेच बळ मिळाले आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्व जग विदूषक आहे असा भास होतो.”