एकीकडे शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगत असताना दुसरीकडे भाजपा विरुद्ध ठाकरे गट असा वादही सुरू आहे. दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्या मुलाच्या लग्नासाठी आलेले आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे’, असं नितेश राणे म्हणाले आहेत. याशिवाय, अमरावती आणि धुळ्यात झालेल्या नारेबाजीवरूनही नितेश राणेंनी टीकास्र सोडलं.

“अशी नाटकं महाराष्ट्रात चालणार नाहीत”

नारेबाजीविषयी प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता नितेश राणेंनी त्यावर टीकास्र सोडलं. “अशा पद्धतीची घोषणा आणि अशी नाटकं आमच्या महाराष्ट्रात चालणार नाहीत. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. तुम्हाला तुमचे सण साजरे करायचे असतील, तर शांततेत करा. हिंदुंना कोणतंही आव्हान द्यायचा प्रयत्न करायचा नाही. आता महाविकास आघाडीचं सरकार नाहीये. नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री नाहीयेत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीयेत. ही सगळी नाटकं जे कुणी करत असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील आणि पुन्हा अशा घोषणा होणार नाहीत याची काळजी आमचं सरकार घेईल”, असं नितेश राणे म्हणाले.

“शिंदे साहेब मर्द आहेत, उद्धव ठाकरेंनाच असले बायकी…” लटकेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावर शिंदे गट संतापला

अंधेरी पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरेंवर टीका

दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना त्यावरून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महानगर पालिकेकडून स्वीकारला जात नसल्यामुळे या निवडणुकीसाठी दुसरा उमेदवार देण्याची तयारी उद्धव ठाकरेंन केल्याबाबत विचारणा केली असता नितेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे काय करतात, याची मला चिंता नाही. उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे. त्यावर जास्त कशाला बोलायचं?” असा खोचक सवाल नितेश राणेंनी केला.