गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. तीन वर्षांपूर्वी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसमवेत केलेला शपथविधी हा शरद पवारांच्या खेळीचा भाग असू शकतो, अशा आशयाचं विधान जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खुद्द अजित पवारांनी अजूनही त्यावर मौन बाळगलं असून त्यावर काहीही बोलणार नाही असं धोरण स्वीकारलेलं असताना आता भाजपाकडून थेट शरद पवारांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
“मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही”, असं जयंत पाटील म्हणाले होते.
दरम्यान, यासंदर्भात जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. “त्यावेळी मी स्वत: म्हटलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
शरद पवारांची शकुनी मामाशी तुलना
दरम्यान, यासंदर्भात भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी टीव्ही ९ शी बोलताना थेट शरद पवारांवर टीका केली आहे. “शरद पवार जर एवढ्या खेळी करत असतील, तर त्यांच्या प्रकृतीवर नक्कीच परिणाम होत असेल. ते एवढी कटकारस्थानं करत असतील, तर ती सामान्य माणसाला न पटणारी असतात. महाभारतात शकुनीने एवढी कट-कारस्थानं केली. जर एवढी कट-कारस्थानं होत असतील, तर ते शकुनीपेक्षा काही कमी आहेत असं म्हणता येणार नाही. मग जयंत पाटलांना असं म्हणायचं आहे का की शरद पवार शकुनीपेक्षा कट-कारस्थानांमध्ये पॉवरफुल आहेत?” असा खोचक सवाल अनिल बोंडे यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा वापर करतायत”
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यावरूनही तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. त्यासंदर्भात बोलताना अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंना दिसतंय की शिवसेना बुडतेय. बुडत्याला काठीचा आधार असतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा वापर उद्धव ठाकरे काठीसारखा करत आहेत. बुडत्या शिवसेनेला किमान वंचित वाचवू शकेल असं त्यांना वाटतंय”, असं अनिल बोंडे म्हणाले.
“बुडत्याचे पाय खोलात असंही म्हणतात. उद्धव ठाकरेंचे पाय जास्त खोलात आहेत कारण विचार वेगवेगळे आहेत. प्रकाश आंबेडकर स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहेत. शिवसेना संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूची आहे. शिवसेनेचा प्रखर हिंदुत्ववाद शिवसेनेचा होता, जो प्रकाश आंबेडकरांना कधीच रुचला नाही. उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या गळ्यातले ताईत आहेत. पण राष्ट्रवादीशी प्रकाश आंबेडकरांचं विळ्या-भोपळ्याचं सख्य आहे. त्यामुळे शिवसेनेचे पाय खोलात चालले आहेत”, असंही बोंडे म्हणाले.