Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पारायला मिळणार आहे. सध्या विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत. या सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी नेते जनतेला आवाहन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या बरोबरच प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत.
यातच महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे. मात्र, ऐन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडीक यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद रंगण्याची चिन्ह आहेत. ‘लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये पैसे घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर महिलांचे फोटो काढून पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो’, असं विधान धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील एका सभेत बोलताना केला आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
हेही वाचा : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
धनंजय महाडीक काय म्हणाले?
“जर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची रॅली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या, ज्या महिला १५०० रुपये आपल्या योजनेचे घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या आणि नावं लिहून घ्या. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे असं म्हणतात. मग पैसे नकोत का? या पैशांचं राजकारण करता? आता काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कोणी मोठ्याने भाषण करायला लागली तर एक फॉर्म द्यायचा आणि या फॉर्मवर सही कर म्हणायचं. नको आहेत ना पैसे. लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं. लगेच बंद, आमच्याकडेही पैसे जास्त झाले नाहीत”, असं विधान खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून व्हिडीओ ट्वीट
खासदार धनंजय महाडीक यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या विधानाचा व्हिडीओ ट्वीट राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “दुश्मनाच्या सुनेलाही ज्यांनी बहिणीचा मान दिला. साडीचोळी देऊन सन्मान केला त्याच शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात…माता भगिनींचा बंदोबस्त करतो, म्हणणाऱ्या भाजपा खासदाराने फक्त राज्यातील माता-भगिनींचाच नव्हे तर माता जिजाऊ, माता सावित्री, माता अहिल्यादेवी या आपल्या आदर्शांचाही अपमान केला आहे. महाराष्ट्र हे विसरणार नाही”, असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
दुश्मनाच्या सुनेलाही ज्यांनी बहिणीचा मान दिला. साडीचोळी देऊन सन्मान केला त्याचं शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात.. माता भगिनींचा बंदोबस्त करतो म्हणणाऱ्या भाजप खासदाराने फक्त राज्यातील माता-भगिनींचाच नव्हे तर माता जिजाऊ, माता सावित्री, माता अहिल्यादेवी या आपल्या आदर्शांचाही अपमान… pic.twitter.com/3gwXo2X1Z4
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 9, 2024
धनंजय महाडीक यांच्याकडून स्पष्टीकरण
“विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार आहे. या योजनेचा मोठ्या प्रमाणात महिलांना फायदा झाला आहे. मात्र, महिलांचा फोटो घ्या आणि त्यांची व्यवस्था करू म्हणजे त्या महिलांना देखील योजनेचा लाभ देऊ अशी माझ्या बोलण्याची भूमिका होती”, असं स्पष्टीकरण धनंजय महाडीक यांनी एबीबी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना दिलं आहे.