बीड : माझा कोणावरही राग नाही. माझा कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याला विरोध नाही. फक्त ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, असे आपले मत आहे. मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला. हैदराबाद गॅझेट बद्दलही मी चुकीचे वक्तव्य केले नाही. जरांगेंनीही समाजामधील दरी तोडली पाहिजे, असे राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांनी जरी उपोषण केले तरी मी पालकमंत्री म्हणून भेट द्यायला तयार आहे. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व होते तेच माझे व्यक्तिमत्व आहे. माझ्या जातीचा असला तरी चुकीच्या भूमिकेला माझा पाठिंबा नाही. प्रत्येकाला एससी, एसटी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. मात्र, हे आरक्षण केंद्र सरकार देते, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

परळी येथील हालगे गार्डन येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात त्या रविवारी बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुक ते जिल्ह्यातील सद्यस्थितीवर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत माझी बाद मतं मोजली असती तरी मी निवडून आले असते. कार्यकर्त्यांच्या आत्महत्यांनंतर मी हरले. त्याच वेळेला मी ठरवलं की आता मारायचं, पण हरायचं नाही. मी एकमेव विधान परिषदेची आमदार आहे जी मंत्रिमंडळात आहे, असेही पंकजा मुंडे यांनी आवर्जून सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत युतीची चर्चा झाली आहे. काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या युतीबाबत महायुतीचे नेतेच निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.

निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी वज्रमूठ करण्याचेही आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात काही ठिकाणी प्रीतम मुंडे लक्ष देतील, मात्र मी केज आणि आष्टीत जास्त लक्ष घालणार असल्याचे सांगितले. माझ्या माणसावर खोट्या केसेस झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

वैद्यनाथ कारखान्याच्या विक्रीबाबतच्या वृत्तावरही पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, काही लोकांचे कारखाने गंजून गेले आहेत. मी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे, मी कसा कारखाना विकेल ? सर्वांच्या कारखान्याला पैसे मिळाले. मात्र, माझ्या कारखान्याला पैसे मिळाले नाहीत. मी माझ्या वडिलांचं चौथं अपत्य जगवलं आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ कारखाना या हंगामात दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार असल्याचे स्पष्ट केले.

बदामराव पंडितांचा भाजपात प्रवेश

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते, माजी राज्यमंत्री तथा गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडित आणि धारूरचे माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी रविवारी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.