नवाब मलिकांविषयी जी भूमिका देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांनी घेतली आहे ती भूमिका प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत न घेतल्याने फडणवीस आणि भाजपाचं ढोंग उघड झालं आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो आहोत की नवाब मलिकांविषयीची भूमिका प्रफुल्ल पटेलांबाबत का नाही? यावर सगळ्यांची तोंडं शिवली गेली आहेत, वाचा बसली आहे. आम्हाला जे म्हणत आहेत की तुम्ही जाळ्यात फसलात ते स्वतःच जाळ्यात फसले आहेत आणि त्यांचा कपाळमोक्ष झाला आहे अशी टीका संजय राऊत यांनी केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आपली भूमिका काय? हा साधा प्रश्न आम्ही विचारला. त्याचं उत्तरच भाजपा आणि देवेंद्र फडणवीस द्यायला तयार नाहीत. उत्तर द्या, सांगून टाका प्रफुल्ल पटेल महात्मा, धर्मात्मा आणि महान व्यक्ती आहेत. इक्बाल मिर्ची हा संत आहे. दाऊद इब्राहिम विश्वपुरुष हे भाजपाने, फडणवीसांनी सांगितलं पाहिजे. त्यामुळे अशा लोकांशी व्यवहार करणं हे काय चुकीचं नाही हे स्पष्ट करा.
भाजपा प्रफुल्ल पटेलांबाबत गप्प का?
“काँग्रेसचे खासदार धीरज साहूंकडे २०० कोटी सापडले म्हणून भाजपाचे लोक ढोल वाजवत आहेत. मात्र ४०० कोटींचा व्यवहार दाऊदच्या हस्तकासह झाला आहे त्याविषयी भाजपा गप्प आहे. दाऊद त्यांचा आहे की प्रफुल्ल पटेल त्यांचे आहेत? दाऊदवर प्रेम आहे की प्रफुल्ल पटेल यांना संरक्षण दिलं जातं आहे याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून करायला हवं होतं. २०२२ ला आमचं सरकार ताब्यात घेतल्यावर त्यांचं म्हणणं होतं की दाऊद इब्राहीम आणि त्याच्या हस्तकांच्या कारवाया नजरेस आल्या तर कठोर कारवाई करेन.”
“आता दाऊद आणि त्याच्या हस्तकाच्या कारवाया उघड झाल्या आहेत. नवाब मलिक यांच्यापुरत्या त्या मर्यादित नाहीत. त्या तुमच्यापर्यंत पोहचल्या आहेत. हे हस्तक मोदी आणि अमित शाह यांना खुलेपणाने भेटत आहेत. मग तुम्ही मोदींवर, अमित शाह यांच्यावर कारवाई करणार ते सांगा. एखादा हस्तक जेव्हा दाऊदशी संबंध ठेवतो तेव्हा त्याचं नेक्सस तोडलं जातं. आता कुणावर कारवाई करणार? जाळं भाजपानेच फेकलं आहे आणि त्यात भाजपाचेच लोक अडकले आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.” संजय राऊत यांनी जी टीका केली आहे त्याला भाजपाकडून काही उत्तर मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.