केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्याभोवती फिरणारं नाट्यसत्र सध्या राज्यात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, त्यानंतरचं तप्त वातावरण, गुन्हा दाखल, अटक, जामीन, शिवसेना- भाजपा राडा…एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशा ह्या घटना मात्र संपायचं नावच घेत नाहीयेत. आता ह्या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका भाजपा आमदाराने आता रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रत्नागिरी पोलिसांकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून तसे कायम चर्चेत असतातच. मात्र आता त्यांच्या या मागणीमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. ही मागणी पूर्ण न झाल्यास आपण न्यायालयाकडे जाऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. भातखळकर म्हणतात, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अन्याय्य अटकेप्रकरणी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीरपणे रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांवर दबाव आणला. अटकेप्रकरणी जी कायदेशीर प्रक्रिया पार पाडायला हवी होती, ती पार पाडली नाही, आपल्या पदाचा गैरवापर केला आणि परब यांनी मंत्री असताना व्यवस्थापनात हस्तक्षेप केला, अडथळा आणला. त्यामुळे त्यांच्याविरोधात २४ तासांच्या आत एफआयआर दाखल करावा अशी मागणी मी रत्नागिरीच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे इमेलद्वारे, पत्र पाठवून केली आहे. जर २४ तासात एफआयआर दाखल झाला नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू आणि पोलिसांच्या न्याय प्राधिकरणाकडेही दाद मागू.


नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नेमके कुणी दिले याची सगळीकडे चर्चा असताना, शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप माध्यमांवर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते अटकेबाबत बोलताना दिसून येत आहेत. त्यामुळे भाजपाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत, न्यायालयात जाण्याची भूमिका घेतल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. तसेच, काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झालं आहे, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will go to court against anil parab because of that video clip atul bhatkhalkar vsk
First published on: 25-08-2021 at 13:40 IST