नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यामध्ये आयोजित करण्यात आलेली भाजपाची विभागीय बैठक रद्द होण्याची शक्यता आहे. पावसाच्या शक्यतेमुळे स्थानिक पातळीवरून तसे कळविण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण १५ मिनिटांत उरकले जाणार असल्याचे समजले.

गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहर व जिल्हा भाजपात केवळ केंद्रीय गृहमंत्री शहा व अन्य भाजपा नेत्यांच्या दौऱ्याच्या विषय चर्चेमध्ये असून, पक्ष पातळीवर अनेक बैठका झाल्यानंतर शुक्रवारी जिल्हा आणि प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक नांदेड विमानतळावर झाली.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम सार्वजनिक असले, तरी सुरक्षेच्या कारणावरून त्यांच्या सर्व कार्यक्रमांबाबत गोपनीयता राखली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि अन्य काही नेतेही सोमवारी नांदेडमध्ये असून, स्थानिक भाजपातर्फे होणाऱ्या जाहीर सभेला मोठी गर्दी व्हावी, यासाठी अशोक चव्हाण, अमरनाथ राजूरकर यांनी नियोजन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आधी आलेल्या दौरा कार्यक्रमात नांदेडमधील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचा स्पष्ट उल्लेख नव्हता. पण आता येणाऱ्या सुधारित कार्यक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर मनपा प्रशासनाने शिष्टाचारानुसार वरील कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. या कार्यक्रमासाठी १५ मिनिटांचा वेळ निर्धारित करण्यात आला असल्याचे मनपा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

नांदेड शहर व जिल्ह्यात मागील एक आठवड्यापासून वळवाच्या पावसाने मुक्काम ठोकला आहे. पुढेही पावसाची शक्यता असल्यामुळे खासदार अशोक चव्हाण यांच्या शिक्षणसंस्थेच्या परिसरातील कुसुम सभागृहात निश्चित करण्यात आलेली भाजपाची विभागीय बैठक रद्द करावी लागली असल्याचे पक्षसंघटनेतील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने शुक्रवारी स्पष्ट केले. खासदार अजित गोपछडे तसेच भाजपा महानगराध्यक्षांच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन गृहमंत्री करणार आहेत. विभागीय बैठक रद्द करून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नवा मोंढा मैदानातील जाहीर सभा यशस्वी करण्याकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून आले.

अधिकृत घोषणा आज-उद्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय गृहमंत्री व अन्य नेत्यांच्या नांदेड दौऱ्यानिमित्त भाजपा खासदार अशोक चव्हाण मागील आठ-दहा दिवसांपासून नांदेडमध्ये तळ ठोकून बसले आहेत. त्यांची वैयक्तिक यंत्रणाही तयारीच्या वेगवेगळ्या कामांमध्ये जुंपलेली आहे. पण सोमवारी येथे होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. गृहमंत्र्यांच्या कार्यालयाकडून अंतिम (सुधारित) दौरा कार्यक्रम प्राप्त होताच शनिवारी किंवा रविवारी सर्व कार्यक्रमांची घोषणा अधिकृतपणे करण्यात येणार आहे.