रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पाटगाव येथे काळ्या रंगाचा नर बिबट्या निपचित पडलेला आढळून आला. या काळ्या बिबट्यावर पशूवैद्यकीय अधिका-यासह घटनास्थळी जावून वनविभागाच्या पथकाने उपचार केले. सद्या या बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
देवरूख पाटगाव येथे सकाळी साडेसातच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला काळा बिबट्या निपचित पडलेला आढळून आला. याबाबतची माहिती पाटगाव ग्रामस्थांनी वनपाल संगमेश्वर देवरुख यांना दिली. या माहितीच्या आधारे वनपाल यांनी वन पथकासह सर्व साहित्य घेवून जागेवर जाऊन खात्री केली असता या ठिकाणी काळा बिबट्या निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आला. या बिबट्याची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज शेट्ये यांनी तपासणी केली. तपासणी नंतर उपासमारीमुळे हा काळा बिबट्या निपचिप पडला असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेट्ये यांनी सांगितले. हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे एक वर्षे आहे. तसेच डॉ. संतोष वाळवेकर, वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी, कोल्हापूर वनविभाग, डॉ. निखिल बनगर वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी सातारा वनविभाग व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प श्री. कुंभार पशुपर्यवेक्षक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली या बिबट्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे.
या बिबट्याची तब्येत बरी होत असून त्याच्यावर आणखी काही दिवस उपचार करणे आवश्यक असल्याचे मत पशुवैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केले आहे. तसेच देवरुख किंवा रत्नागिरी मध्ये बिबट्या करिता वैद्यकीय सुविधा नसल्याने, जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने तसेच वातावरणात होणा-या बदलामुळे मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर गुरुप्रसाद यांचे मार्गदर्शन खाली बिबट्या वर उपचार करण्यासाठी सातारा वनविभाग मधील टिटिसी सेंटर सातारा येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेने रत्नागिरी जिल्ह्यात काळ्या रंगाचे बिबटे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.