अहिल्यानगर : सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय ५७) यांना नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, शुक्रवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सुधाकर मुंडे हे वर्ग एक दर्जाचे अधिकारी असल्यामुळे नगर शहरातील ऐश्वर्या नगरी (श्रीराम चौक, पाईपलाईन रस्ता) येथील घराची झडपी घेण्यात आली. तेथे त्यांच्या मालकीचे स्वतःचे घर, अलीशान चारचाकी मोटर, ७० हजार रुपये रोख व ५ तोळे सोन्याचे दागिने आढळले.

तक्रारदार सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. त्यांच्यावर पूर्वी राहुरीच्या गट विकास अधिकारी यांच्या अहवालावरून जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती. निलंबन सुरू असतानाच तक्रारदार ग्रामसेवक सेवानिवृत्त झाले. त्यांच्यावरील दोषारोपपत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता. तो अहवाल तक्रारदाराच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगर शहरातील मुंडे यांच्या राहत्या घरीच ही कारवाई करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे, हवालदार चंद्रकांत काळे, सचिन सुद्रुक, हरुण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.