सांगली : तासगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये १६ ठिकाणी घरफोड्या करणार्‍या अट्टल तीन चोरट्यांना पोलीसांनी अटक करून १९ लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात तासगाव पोलीसांना यश मिळाले असल्याची माहिती उप अधिक्षक सचिन थोरबोले यांनी बुधवारी दिली. या टोळीतील दोघे फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

घरफोडी अटक करण्यात आलेल्यामध्ये जितेंद्र दगडू काळे (वय ४८), संजय जंगाप्पा काळे (वय ४०) आणि निहाल जितेंद्र काळे (वय १९ सर्व रा.करगणी ता. आटपाडी) यांचा समावेश असून रोहित पवार (रा. करगणी ता. आटपाडी) व सनी अर्जुन शिंदे (रा. फलटण, जिल्हा सातारा) हे फरार आहेत.

आणखी वाचा-अदृष्य शक्ती मराठा-ओबीसी समाजाला भिडवण्याचे काम करत आहेत – प्रकाश आंबेडकर

घरफोडी व चोरी प्रकरणाचा पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाने याबाबत तांत्रिकदृष्ट्या व गोपनीय बातमीदारांमार्फत तपास सुरू होता. तपास करीत असताना करगणी येथील काही चोरीचे प्रकार करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे या तिघांना ताब्यात घेउन चौकशी केली असता त्यांनी १६ घरपोडींचे गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली. या टोळीने गुन्ह्यात वापरलेला टेम्पो (एम.एच. १० सीआर १९७७) व घरफोडीच्या गुन्ह्यात चोरी केलेले एकूण तीनशे दोन ग्रॅम वजनाचे व १८ लाख ४२ हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे व ६१ हजार दोनशे रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण २६ लाख ३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तासगाव तालुक्यातील वायफळे, मांजर्डे, बलगवडे, नागेवाडी, हातनोली, गौरगाव, वायफळे, बिरणवाडी, वासुंबे, बलगवडे, बस्तवडे या गावात १६ ठिकाणी वरील आरोपींनी घरफोड्या केल्याचे संशयितांनी कबूल केले असल्याचे निरीक्षक श्री. वाघ यांनी सांगितले.