वाई: कोयनेच्या शिवसागर जलाशयावर तापोळा येथे अत्याधुनिक जर्मन  तंत्रज्ञानावर आधारित ‘केबल स्टे’ पुलाचे काम साताऱ्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. या पुलामुळे महाबळेश्वरच्या पर्यटन वाढीसाठी मदत होणार आहे.

महाबळेश्वर या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर दरवर्षी सुमारे वीस लाख पर्यटक येतात. येथे मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने तापोळा येथील शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहिर दरम्यान पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसागर जलाशयाकडील अहिर या ठिकाणी जाण्यासाठी या पुलाचा फायदा होणार आहे. या पुलामुळे सुमारे १३ किलोमीटर अंतर कमी होणार आहे. याचा फायदा जलाशयापलीकडे राहणाऱ्या दुर्गम भागातील लोकांना होईल. तसेच या भागात जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनाही होईल.  सध्या येथे वाहतुकीसाठी वापरत असलेला धोकादायक जलप्रवास (बोटीने व बार्जने) टाळता येईल. शिवाय वेळेची बचत होईल. या प्रस्तावित पुलामुळे सोळशी, कांदाटी, कोयना खोऱ्याचा भाग जवळच्या मार्गाने जोडला जाणार आहे. सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात व सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील शेती कुटीर उद्योगाला चालणा मिळण्यासाठी या पुलाची मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी जलाशयाकडील दुर्गम गावात मूलभूत सुविधा तातडीने पोचवणेही शक्य होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धार्मिक स्थळ उत्तरेश्वर मंदिर देवस्थान हे जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहे. शिवसागर जलाशयावर होणारा हा पूल पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या निश्चित वाढणार आहे.

तापोळा ते अहिर (ता. महाबळेश्वर )या दुर्गम भागात होणारा केबल स्टे पूल हा ५४० मीटर लांब १४.१५ मीटर रुंद असणार आहे. कोयनेचा शिवसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरही पाण्याच्या पातळीपासून ‘केबल स्टे पूल’ हा ११ मीटर उंच असेल. पुलाच्या दोन्ही बाजूला फुटपाथ असणार आहेत. पुलाच्या मध्यभागी ‘पायलॉन’वर पुलापासून ४३ मीटर उंचीवर प्रेक्षक गॅलरी बांधण्यात येईल. येथून पर्यटकांना तापोळा परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येईल. प्रेक्षा गॅलरीत पोहोचण्यासाठी दोन्ही बाजूला कॅप्सूल लिफ्ट तसेच जिना असेल. पर्यटकांसाठी तापोळा येथे वाहनतळ बांधण्यात येईल.  या पुलाच्या बांधकामास १७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून दोन वर्षांत काम पूर्ण होणार आहे. या पुलामुळे पर्यटन वाढीस मोठय़ा प्रमाणात चालना मिळणार आहे.

 – महेश गोंजारी,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाबळेश्वर