​सावंतवाडी : बेळगाव-दोडामार्ग-गोवा मार्गावरील तिलारी घाटात एका कारला आग लावल्याने खळबळ उडाली आहे. गोमांस वाहतुकीच्या संशयावरून काही अज्ञात व्यक्तींनी ही घटना घडवली. मात्र, कार चालकाने दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये बकऱ्याचे मांस होते.

तिलारी घाटातून भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली गोमांस नेले जात असल्याचा संशय होता. यापूर्वीही एका टेम्पोला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरुवारी विजघर चेकपोस्टजवळ एका लाल रंगाच्या कारची तपासणी केली असता त्यात मांस आढळून आले. ही कार घेऊन पोलीस दोडामार्ग पोलीस ठाण्याकडे जात असताना तिलारी नजीकच्या पाताळेश्वर देवस्थानाजवळ अज्ञात व्यक्तींनी ती अडवली.

​या जमावाने प्रथम कारचालक निझाम खुरोशी (रा. वास्को, गोवा) याला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर कारला आग लावली. या घटनेमुळे दोडामार्ग तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बांदा आणि सावंतवाडी येथून अतिरिक्त पोलीस फौज बोलावण्यात आली.

कार पेटवून दिल्याने दोडामार्ग-बेळगाव मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती आणि ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. दोडामार्ग नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली.पोलिसांनी सांगितले की, विजघर चेकपोस्टवर चालकाने कारमध्ये बकऱ्याचे मांस असल्याचे सांगितले होते आणि त्याने संबंधित कागदपत्रेही दाखवली होती. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.