लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : विडणी (ता. फलटण) येथे अज्ञात महिलेचा अंधश्रद्धेतून शुक्रवारी खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात रोज नवनवे खुलासे येऊ लागले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी मृतदेहाचे अवयव, शोधण्याचे काम सुरू असून, रविवारी एका ठिकाणी शेतात मृतदेहाचे काही अवयव पोलिसांना आढळून आले. आज या परिसरात पोलिसांना खून करण्यासाठी वापरली जाणारी तीन शस्त्रे मिळून आली. खून करून चारही दिशांना मृतदेहाचे अवशेष टाकून नैवेद्याचा नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे.

उसाच्या शेताजवळ महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आला होता. त्या परिसरात पूजेचे साहित्यही पडलेले होते. त्यामुळे हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृतदेहाचा उर्वरित भाग शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. वरील भाग शोधण्यासाठी परिसरातील १६ एकरांतील ऊस तोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी पाचशे मीटर परिसरात ऊसतोड कामगार, शेत मालकांशिवाय इतरांना प्रवेश बंदी केली आहे, तसेच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

आणखी वाचा-पर्यटकांच्या हुल्लडबाजीतून पाचगणीत रानगव्याचा हल्ला

घटनास्थळी तीन दिवसांपासून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पोलीस उपअधीक्षक राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक घटनास्थळी तळ ठोकून आहेत. रात्रंदिवस पोलीस पथके तपास करत आहेत. वेगवेगळ्या पथकांकडून माहिती जमा करून तपास केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनास्थळी परिसरात १६ एकरांपैकी दहा एकर ऊसतोड करून परिसर मोकळा केला. श्वानाद्वारे तपासणी केली, परंतु अवयव काही मिळून आले नाहीत. विडणी गावात व घटनास्थळ परिसरात लोकांची पोलीस चौकशी करीत आहेत. तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी तपास अत्यंत गोपनीय ठेवला आहे. सापडलेल्या मृतदेहाचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. स्वतः पोलीस अधीक्षक समीर शेख वेळोवेळी तपासाची माहिती घेत आहेत.