सावंतवाडी:दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक गवस यांच्यासह ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारख्या गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि दीपक गवस यांच्यासह काही जणांना अटक केली आहे. गोमांस असल्याच्या संशयावरून एका गाडीची तोडफोड करून ती पेटवून दिल्याची घटना २५ सप्टेंबरला घडली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस हवालदार परशुराम गंगाराम सावंत यांनी या प्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. हवालदार सावंत हे निजामुद्दीन कुरेशी यांच्या ताब्यातील बकरा सदृश्य असलेल्या प्राण्याचे मास असलेली कार दोडामार्ग पोलीस ठाण्यात पुढील तपासणीसाठी घेऊन जात होते. यावेळी पाळये पाताडेश्वर मंदिराच्या जवळ, सुमारे ५० ते ६० लोकांनी त्यांची गाडी वाहने आडवी टाकून थांबवली. जमावाने गाडीच्या काचा दगड व लाकडी दांड्याने फोडल्या. चालकाला बेदम मारहाण केली. आणि नंतर गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली.

या घटनेनंतर हवालदार सावंत यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, महिंद्र खरवस आणि वैभव रेडकर यांना ताब्यात घेतले. ही माहिती पसरताच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दोडामार्ग पोलीस ठाण्यासमोर जमले, पोलीस ठाण्यात घोषणाबाजी करण्यात आली. गोमांस तस्करीला आळा घालण्याची मागणी केली, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी रात्री उशिरा दोडामार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.दरम्यान न्यायालयात नगराध्यक्ष चेतन चव्हाण सह भाजप तालुका अध्यक्ष यांना हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.