रत्नागिरी जिल्ह्य़ात सागरी किंवा महामार्गावरून होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे.
कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे सध्या रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्यासमवेत माहिती देताना ते म्हणाले की, या जिल्ह्य़ाला मोठी किनारपट्टी लाभली असून त्या टापूत १४ सागरी पोलीस ठाणी आहेत. या सर्व ठिकाणी, तसेच मुंबई-गोवा महामार्गावर चार ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्तजिल्ह्य़ातील १८ पोलीस ठाण्यांमध्येही या कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आणि देवरुख या नगर परिषदा-पंचायतींच्या सहकार्याने व परस्परांना पूरक अशा पद्धतीने संबंधित शहरांमध्येही सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सर्वसाधारण कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असले तरी त्याच बरोबरीने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्त लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून बुरडे म्हणाले की, केवळ गुन्हेगारांचा तपास लागून उपयोग नाही. गुन्ह्य़ांबद्दल पकडण्यात आलेल्या आरोपींना शिक्षा होणेही महत्त्वाचे आहे. एकेकाळी राज्य पातळीवर हे प्रमाण जेमतेम ५ टक्के होते, पण अलीकडील काळात राज्याच्या गृह खात्याने पोलीस दलाला जास्त अधिकार दिल्यामुळे चांगला परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात हे प्रमाण ३५ टक्क्यांवर पोचले आहे. रत्नागिरी शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले असून, त्यानुसार अंमलबजावणीही सुरू झाली आहे. तसेच अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या १८६ वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी या वेळी दिली.