मुंबई : मराठा आरक्षणाचा निर्णय सकारात्मक झाला नाही, तर सरकारला जेरीस आणण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे अधिकाधिक उमेदवार उतरवून आव्हान उभे करण्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी अनामत रक्कम दोन गावांतून एक या पद्धतीने उभी करावी, असेही ठरू लागले आहे. मात्र, या चर्चेला जरांगे पाटील व त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी अद्याप होकार दिलेला नाही. मराठा समाजात मात्र निवडणुकीच्या या पर्यायावर जोरदार चर्चा सुरू आहे.

जरांगे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यास साजेशी ही कृती असेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईकडे जरांगे यांची गाडी जात असताना आंदोलकांनी आक्रमक घोषणाबाजी केली. मराठा समाजात निवडणुकीच्या अनुषंगाने काही रणनीती ठरत आहे का, याची विचारणा करण्यासाठी जरांगे यांच्या आंदोलनात पहिल्या टप्प्यापासून सहभागी असलेले प्रदीप सोळंके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘निवडणुकीमध्ये अधिकाधिक उमेदवार उतरवावेत, अशी चर्चा समाजात आहे. पण त्याला कोणीही मान्यता दिलेली नाही. निवडणूक रणनीतीचा काहीही विचार झालेला नाही.’

हेही वाचा >>>“विरोधकांच्या पत्रातलं एक वाक्य मनोरंजक, ते म्हणतात…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला!

राज्यातील १३ ते १५ लोकसभा मतदारसंघांत या रणनीतीचा प्रभाव दिसू शकेल, असे सांगण्यात येते. मराठा समाजात जोरदार सुरू असलेल्या या चर्चेला आंदोलक नेत्यांची अद्याप मान्यता मिळालेली नाही.

सलाईनमधून विष देऊन, एन्काऊन्टर करून किंवा उपोषणातून मला संपविण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. आपला बळीच घ्यायचा असेल तर आपणच फडणवीस यांच्या सागर बंगल्यात जाऊ आणि तेथे त्यांनी आपला बळी घ्यावा. सरकारने मराठा समाजास दिलेले दहा टक्के आरक्षण स्वीकारत नाही म्हणून आपल्या बदनामीचे षडयंत्र रचले आहे. – मनोज जरांगे-पाटील, मराठा आंदोलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझे ‘सागर’ हे शासकीय निवासस्थान असून ते जनतेला शासकीय कामासाठी नेहमीच खुले आहे. तेथे येण्यासाठी कोणाचीही अडवणूक होणार नाही. जरांगे यांनी माझ्याविरोधात निखालस खोटे व बिनबुडाचे आरोप केले असून त्यांना मला त्यावर उत्तरही द्यावेसे वाटत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याप्रमाणे जरांगे हे स्क्रिप्ट का वाचत आहेत?- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री