Chandrakant Khaire : विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे ठाकरे गट आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी सावध पावलं टाकत असल्याचं पाहायला मिळतं आहे. ठाकरे गटाकडून आगामी महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही ठाकरे गटाकडून देण्यात आल्या आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची आणि भारतीय जनता पार्टीकडून राज्यपाल पदाची ऑफर आली होती’, असं मोठं विधान चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटात स्पर्धा सुरु झाली आहे. दोन्ही पैकी कोण शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांना त्यांच्या पक्षात घेतो. असं सर्व सुरु आहे. ते एकमेकांना आमिष दाखवत आहेत. मात्र, आमचे शिवसैनिक त्यांच्या या आमिषाला बळी पडणार नाहीत. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका असो किंवा छत्रपती संभाजीनगर महापालिका असो आम्ही जिंकणार आहोत. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून आमच्या विरोधात वातावरण खराब करण्याचं प्रयत्न सुरु आहे. मात्र, लोकांना हळूहळू सत्य समजेल”, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

कोणत्या पक्षाकडून ऑफर आल्या?

“मला अनेकवेळा ऑफर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून मला अनेक मोठमोठ्या नेत्यांकडून ऑफर आल्या आहेत. मात्र, मी त्यांना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात काम करणार आहे. मला शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या आधी ऑफर होती. कारण त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार मिळत नव्हता. संजय शिरसाट यांनी दोन-तीन लोकांकडे सांगितलं होतं की त्यांना म्हणजे मला घेऊन या आम्ही सर्व खर्च करू वैगेरे, पण मी त्यांना नकार दिला”, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाने काय ऑफर दिली होती?

“भारतीय जनता पक्षाकडून मला खूप वेळा ऑफर आली. भाजपाचे काही नेते माझ्याकडे अनेकदा येऊन गेले. यामध्ये महाराष्ट्रातील काही नेते होते. मात्र, माझा संपर्क अनेक वर्षांपासून दिल्लीतील नेत्यांबरोबर देखील आहे. त्यामुळे मला दिल्लीमधूनही ऑफर आली होती. अनेक मान्यवरांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येऊन जा. आम्ही तुम्हाला राज्यसभेची खासदारकी आणि मंत्री करतो. त्यानंतर काही दिवसांपूर्वी हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले, तेव्हा मलाही सांगितलं की तुम्हाला राज्यपाल करू अशी ऑफर दिली होती. मात्र, मी त्यांना नकार दिला”, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला.