शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. ठाकरेंच्या राजीमान्यामुळे आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाने भाजपाशी बोलणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळताच भाजपाच्या गोटात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुत्त्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ आली नसती, अशी खोचक टीका पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, भाजपाचा संघर्ष आता कोणाशी? सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

“उद्धव ठाकरे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले नसते, तसेच त्यांनी हिंदुत्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ आली नसती. सरकार बनवण्याचा दावा कधी करणार त्यावर निर्णय व्हायचा बाकी आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ. अजून याबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा >>> उद्धव यांनी CM पदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पत्रकारांच्या प्रश्नावर हात जोडून म्हणाले, “आम्ही…”

तसेच, “एकनाथ शिंदेंसोबत काम करणार आहोत हे स्पष्टच आहे. हा दिवस अचानक आला आहे. नाहीतर उद्याचा पूर्ण दिवस टेन्शनमध्ये गेला असता. आता एक दिवस रिलॅक्स मिळाला आहे. बसून चर्चा करू आणि नंतर ठरवू,” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

भाजपाच्या जल्लोषाचा व्हिडीओ –

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; दीपक केसरकरांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तर दुसरीकडे भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यानीदेखील उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. बहुमत गमावल्यानंतर संविधानानुसार राजीनामा द्यावा लागतो. तो ठाकरेंनी दिला आहे, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच, आमचा संघर्ष आता शिवसेनेशी नसेल. तर आगामी काळात आमचा संघर्ष हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी असणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.